दहशतवादाचा क्रूर ‘हिरवा’ चेहरा, उखडून टाकणार ‘भगवा’ मोहरा !

‘ऑपरेशन सिंदूर’ च्या निमित्ताने संपूर्ण जगाने पाकिस्तानच्या पाठिंब्यावर सुरू असलेल्या दहशतवादाचा क्रूर हिरवा चेहरा पाहिला..भारताची तिन्ही सुरक्षा दले म्हणजे लष्कर, हवाई दल आणि नौदल यांनी एकी दाखवली आणि नियोजनबद्ध रीतीने या दहशतवादाचा बीमोड केला.. ते देशभक्तीचे भगवे मोहरेही अवघ्या जगाने पाहिले.. युद्धाच्या रणांगणात कधीही, कुठेही आणि केव्हाही भारत पाकिस्तानला नामोहरम करू शकतो, याचा एक मोठा धडा भारताने घालून दिला आहे.
उद्ध्वस्त पाकिस्तान, बेचिराख एयरबेस..
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी वायुसेनेच्या २० टक्के ‘ऑपरेशनल इन्फ्रास्ट्रक्चर’ ची भयंकर वाताहत झालेली आहे, पाकिस्तानचे अनेक एयरबेस उद्ध्वस्त झाले आहेत. एवढेच नव्हे तर पाकड्यांच्या एअर डिफेन्स यंत्रणांची जवळपास ७५ टक्के पूर्णपणे नासाडी झालेली आहे. त्यांच्या हवाई दलाची ३० ते ९० लढाऊ विमाने त्यांच्या बंदिस्त तळांवर नष्ट झालेली आहेत. पाकिस्तानी अण्वस्त्रे जिथे साठवली जातात आणि अण्वस्त्र हल्ल्यांसाठी जिथे ठेवली जातात अशा तीन एअरबेसवर त्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. भारताच्या तिन्ही दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या आकडेवारीसह मुद्दाम हे नमूद केले आहे.
अण्वस्त्रे नष्ट झाल्याचा पुरावा नाही..
भारतीयांनी चढवलेल्या या हल्ल्यांच्या दरम्यान पाक अण्वस्त्रे नष्ट झाली, याचा कोणताही खात्रीशीर पुरावा सध्यातरी कोणीच दिलेला नाही आणि या संदर्भात ज्या बातम्या येत आहेत, त्या विश्वासार्ह नक्कीच नाहीत. या संदर्भात पहिले पिल्लू अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सोडले. ” युद्ध चालू राहिल्यास लाखो लोक मारले जातील, म्हणून युद्धबंदी केली पाहिजे.” असा दावा त्यांनी करून अणूयुद्ध टाळल्याचा शड्डू ठोकला आहे. त्याच्या या ट्विटवर लोकांनी नूर खान एअर बेसवर असलेल्या किराना हिल्स न्युक्लिअर स्टॉक पाईल्स गेटवर भारताने हवाई हल्ला केला, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या खऱ्या, पण पुन्हा त्यात अण्वस्त्रांचा उल्लेख नाही.
किरणोत्सर्ग, भूकंपाच्या बातम्या
त्यानंतर, मग पाकमध्ये किरणोत्सर्ग पसरला आहे, अशी खोटी पत्रे प्रसारित झाली, त्यानंतर इजिप्त मधून बोरॉन घेतलेले विमान पाकिस्तानात उतरले ही बातमी आली. आता लिकेजमुळे पाकिस्तानी लोकांना उलट्या सुरू झाल्या, अशा बातम्या पेरल्या जात आहेत. त्याजोडीला पाकिस्तानात हलके भूकंप झाल्याच्या बातम्या नित्य येत आहेत. प्रत्यक्षात काय झाले आणि तिथे परिस्थिती काय आहे, याचा नेमका अंदाज कुणालाही नाही.
हेही वाचा : पुण्यासह ‘या’ भागात कोसळधार पाऊस, राज्यात मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा
भारताचे ‘ऑपरेशन्स कमांडर’ काय म्हणतात?
दोन दिवसांपूर्वी, पत्रकार परिषदेत वरिष्ठ वायू सेना अधिकाऱ्याला अण्वस्त्रसाठ्यांवर केलेल्या हल्ल्याबाबत विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिले, ते सध्या तरी प्रत्येक भारतीयाने ‘अंतिम सत्य’ मानले पाहिजे. ते म्हणाले ‘तिथे अण्वस्त्रे होती, हे मला आत्ता कळले, आम्ही त्यावर हल्ला केलेला नाही !’
खोटं पसरवण्यात तरबेज..
पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘साय वॉर’ अर्थात मनोवैज्ञानिक युद्धात तरबेज आहेत. त्यांची जनता त्यांच्या संस्थांच्या कौशल्यामुळे अजूनही हेच मानते, की पाकिस्तानने १९६५ आणि १९७१ ची युद्धे जिंकलेली आहेत. त्यांच्या सोयीच्या बातम्या भारतीय मीडियात पेरण्यासाठी ते उथळ, भोळ्या,अति उत्साही, बिनडोक, मूर्ख भारतीय सोशल मीडिया युजर्सचा खुबीने वापर करून घेतात, हे देखील आता सर्व भारतीयांना माहीत झाले आहे.
भारतीयांची मूर्खपणाची मानसिकता..
भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यांवर हल्ला करून समस्त प्रजेला आण्विक प्रदूषणात लोटले, भारत युद्धखोर आहे, भारत, चीन आणि अन्य प्रतिस्पर्धी देशांसाठी भविष्यात डोकेदुखी ठरेल, भारतीय प्रजा युद्धखोरीला उत्तेजन देते इत्यादी अनेक पाकिस्तानी सिद्धांत आपण स्वतःच्या हाताने आणि कृतीने जगाला सिद्ध करून दाखवत आहोत.
विदेशी गुप्तचरांचे जाळे, हसणारे भारतीय..
एक लक्षात घ्यायला हवे, आपण विदेशी गुप्तचर यंत्रणेच्या अत्यंत स्मार्ट सापळ्यात अडकलेले आहोत आणि यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या प्रयत्नाची गरज आहे. त्यासाठी योग्य माहिती बाळगणे आणि सूज्ञपणाने वागण्याची आवश्यकता आहे. भारताने खरेच हल्ला केलेल्या जागा उघड उघड सांगितल्या आहेत. भारतीय पंतप्रधानांनी तर ‘आम्हाला आण्विक हल्ल्याच्या धमक्या देऊ नका,’ हे अख्ख्या जगासमोर सांगितले आहे. भारतीय हल्ल्याचे बळी पडलेल्या एअरबेसवर काही आण्विक तळ होते आणि त्या बेस वर कित्येक पाक सैनिक बळी पडलेले आहेत. सध्या आपल्यासाठी इतकी माहिती पुरेशी आहे. यापेक्षा अन्य माहिती आपल्यासाठी सोयीची नाही, किंवा त्याचा गवगवा करण्याची गरज नाही !
आपल्या बावळटपणाला उत्तर काय?
नुकतीच एक ब्रेकिंग बातमी पाहिली..अमूक गावच्या जवानाने पाडले पाकचे ११ ड्रोन ! परिसरातून झाला कौतुकाचा वर्षाव!.. या बातमीत तो जवान कुठे तैनात आहे, त्याचचे नाव काय, यासह त्याचा कानाला कम्युनिकेशन पॉड लावलेला फोटो सुद्धा आहे ! हा मूर्खपणा कुठपर्यंत जाईल कल्पना आहे? त्याच्या एअर डिफेन्स युनिटची लोकेशन एव्हाना जगाला कळलेली आहे, त्याचे नाव, पत्ता उघड आहे, फोटो छापलेला आहे ! उद्या हा जवान पाकिस्तानी ‘हनी ट्रॅपिंग’ चा बळी ठरल्यास याला जबाबदार कोण? उथळ मीडिया? की आम्हा भारतीयांचा बेजबाबदार मूर्खपणा ? की पायावर धोंडा पाडून घेण्याची वृत्ती?
आत्मचिंतन आणि संयमाची गरज !
सद्य परिस्थितीचा संपूर्ण गोषवारा काढला तर जियोपॉलिटिक्स, डिफेन्स, इंटर्नल सिक्युरिटी, इंटेलिजन्स या विषयात आपल्याला मोठ्या साक्षरतेची गरज आहे..अमूकला ठोकला, तमूकला उडवला..वगैरे गोष्टींच्या बाहेर बराच मोठा हिस्सा आहे, जो आपल्याला माहीत नाही. आलेली प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकून तिला मसाला लावून साजरी करणे अनेक वेळा योग्य नाही आणि आवश्यक त्याहूनही नाही.. कुठेतरी मननाची, आत्मचिंतनाची आणि संयमाची गरज आहे!
भारताचे उज्ज्वल भवितव्य..
आपली अर्थव्यवस्था येणाऱ्या दोन वर्षात जपान आणि जर्मनीला मागे टाकून जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेली असेल. सध्या आपल्याकडे दोन विमानवाहू युद्धनौका आहेत, भविष्यात आपले जागतिक आर्थिक हितसंबंध राखण्यासाठी आपल्याकडे ७ ते १० विमानवाहू युद्धनौका असतील आणि त्या साता-समुद्रात गस्त घालत असतील. तेव्हा आपली मिसाईल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मारा करू शकतील. आपण लक्ष्य करू तो सॅटेलाईट पाडू असे तंत्रज्ञान आपल्याकडे असेल. त्यावेळी आपली जनता अत्यंत प्रबुद्ध आणि जियोपॉलिटिक्स, डिफेन्स, इंटर्नल सिक्युरिटी, इंटेलिजन्स या विषयात किमान आवश्यक ज्ञान बाळगणारी असली पाहिजे, असे वाटत नाही का ?
फालतू प्रश्नांना आवरा..
विनाकारण, युद्धबंदी का केली? पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान स्वतंत्र करून मोदी का थांबले नाहीत? इतक्या या सोप्या गोष्टी नाहीत. आपल्याला मूलभूत गोष्टींच्या कल्पना नाहीत आणि फुकट डेटासह मजबूत लोकशाही असल्याने आपण काहीही प्रश्न विचारू शकतो, हा भाग वेगळा !
युद्धे आणि मर्यादित स्वरूपाची ऑपरेशन्स!
थोडक्यात लक्षात घ्या, २०१६, २०१९ आणि ‘ऑपरेशन सिन्दूर’ या कारवाया “कायनेटिक मिलिटरी ऑपरेशन्स” या प्रकारात मोडतात. अशी ऑपरेशन्स एका मर्यादित उद्दिष्टासाठी असतात, कोणताही भूभाग ताब्यात घेण्यासाठी नाही तर एक तगडा संदेश देण्यासाठी असतात. तो संदेश आपण पहिल्या दिवशी दिला आणि आपण कारवाई थांबवायची घोषणा केली. पाकिस्तानने त्यावर उलट हल्ले केले म्हणून आपण दुसऱ्या टप्प्यात अजून हल्ले केले आणि पाकिस्तानी वायुसेनेच्या तळांची वासलात लावून आपण थांबलो.
आपल्याला फालतू चर्चेमध्ये रस..
फालतू गोष्टींची चर्चा करण्यात आणि वाच्यता करण्यात सर्व देश गुंतल्यामुळे आपण दि. ७ मे रोजी घोषित केलेली “ऑपरेशन संपल्याची” घोषणा ऐकली नाही. यात दोष हा आपला मीडिया आणि आपली या विषयातली अनभिज्ञता आहे, एवढे समजले तरी पुरेसे आहे !