राज्याला ५४ लाख लसींचा पुरवठा, मग २३ लाखच लसीकरण का?, प्रकाश जावडेकरांचा सवाल
![Supply of 54 lakh vaccines to the state, then why only 23 lakh vaccinations ?, Prakash Javadekar's question](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Prakash-Javadekar.jpeg)
नवी दिल्ली – कोरोनावर प्रतिबंध ठरणाऱ्या लसीकरणाला भारतात सुरुवात झाली आहे. फ्रंट लाईन वर्कर्सना लसीकरण झालं असून आता दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. मात्र, यावरूनही आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये द्वंद्व निर्माण झालं आहे. महाराष्ट्राला आतापर्यंत ५४ लाख कोरोनाच्या लसी दिल्या, मग आतापर्यंत फक्त २३ लाखांचं लसीकरण का झालं? असा सवाल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्र सरकारला विचारला आहे. त्यांनी ट्विट करत राज्य सरकारला फटकारले.
वाचा :-सरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन
देशात पुन्हा कोरोनाचा कहर निर्माण झाला आहे. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 17864 रुग्ण सापडले आहेत. तर केरळ, कर्नाटक आणि पंजाबमध्ये एक हजार रुग्ण सापडले आहेत.
आधी दिलेल्या लसींपैकी केवळ ५६ टक्केच लसीकरण करण्यात आलं आहे. त्यातच शिवसेनेचे खासदार आणखी लसीचे डोस मागत आहेत, लॉकडाऊन काळात राज्यात व्यवस्थापनाचा अभाव होता, आता लसीकरणावेळीही तेच सुरू आहे, अशी टीकाही प्रकाश जावडेकर यांनी केली.
Maharashtra Government had only used 23 lakh vaccines out of the total 54 lakh vaccines sent to the state, till 12th March. 56% vaccines remained unused. Now, Shiv Sena MP asks for more vaccines for the state.
First mismanagement of pandemic now poor administration of vaccines.— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) March 17, 2021
टोपेंनी काय मागणी केली?
दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे काल दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे लसीच्या अतिरिक्त साठ्याची मागणी केली आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते. राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात व यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्याचबरोबर 60 वर्षावरील व 45 वयोगटा वरील (सहव्याधी असलेले) सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये 1.77 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून या सर्वांना पहिला डोस मे पर्यंत तर दुसरा डोस जून पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 2.20 कोटी कोव्हीडशिल्ड व कोवाक्सिन लसींचा आवश्यकता आहे. या अनुषंगाने दर आठवड्यात 20 लाख लसींचा पुरवठा करण्याची विनंती टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणीही त्यांनी केली.