अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या पद्धतीने मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या पक्षी, प्राणी यांना जीवदान
चारशे पक्षी, प्राण्यांवर यशस्वी उपचार

नाशिक : वर्षभरापूर्वी शहरांमध्ये सुरु झालेल्या म्हसरूळ येथील वन्यजीव उपचार केंद्रामध्ये ३८८ पक्षी व प्राण्यांना यशस्वी उपचार करून नैसर्गिक अधिवासमध्ये सोडण्यात आलेले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उपचार पद्धतीने मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या पक्षी, प्राणी यांना जीवदान मिळाले आहे.
जंगलामध्ये जखमी झालेल्या वन्यजीव, पक्षी, प्राणी यांना उपचाराअभावी जीव गमवावा लागू नये म्हणून शासनाने म्हसरुळ येथे वन्यजीव उपचार केंद्राची स्थापना करत ते कार्यान्वित केले आहे. या उपचाराकेंद्राच्या निर्मितीमुळे जिल्ह्यातील जखमी पशुपक्षी, प्राणी यांच्यावर योग्य उपचार होत असून त्याचे आयुष्य वाढत आहे. मागील वर्षभरामध्ये या
केंद्रात ८४१ विविध प्रकारचे प्राणी उपचारासाठी दाखल झाले होते. यापैकी ११२ प्राण्यांना इतर ठिकाणी उपचारासाठी हलविण्यात आले तर १६७ प्राण्यांचा उपचार होण्याआधीच मृत्यू झाला. तर ३८८ पक्षी, प्राण्यावर यशस्वी उपचार करत त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे.
सद्य:स्थितीला उपचार केंद्रात २८ प्राणी उपचार घेत आहे. पक्षी व प्राण्यांच्या एकूण १०० पेक्षा अधिक प्रजातींना वन्यजीव उपचार केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. यामध्ये उदमांजर, पांढऱ्या छातीचा पवन कोंबडा, काळवीट, पिंगळा, भारतीय ससा, स्टार कासव, बिबट्या,घोणस विविधरंगी कुकरी, पोपट, घार, चिमणी, कोल्हा, जंगल मैना, लांब चोचीचे गिधाड व कोकिळ यांचा समावेश आहे.
हेही वाचा : उडणार इलेक्शनचा धुरळा!
दोन एकर परिसरात केंद्र
म्हसरूळ येथील वनविभागाच्या जागेत वन्यजीव उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. उपचार केंद्रात उपचारासाठी येणारा प्रत्येक वन्यजीवांची नोंद व त्यांच्यावर केले जाणारे उपचार याबद्दलची माहिती ऑनलाइन स्वरूपात अपडेट केली जाते.
वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही वेळोवेळी ही माहिती प्राप्त होत असते. सस्तन प्राण्यांमधील वाघ, लांडगा, कोल्हा, बिबट्या, हरिण, माकड यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. यामध्ये आयसीयू, ऑपरेशन, आयसोलेशन, एक्स-रे, मेडिकल, पक्ष्यांसाठी फ्लाइंग टेस्ट, एरिया रेस्क्यू वाहन आदी सुविधा उपलब्ध आहे.
पक्ष्यांसाठी फ्लाइंग झोन एरिया
पक्षांच्या पंखांना दुखापत झाली तर त्यांना उडता येत नाही. त्यांच्या पंखा जवळील हवेची पिशवी फाटलेली असते. उपचारानंतर त्यांना उडता येत आहे की नाही यासाठी फ्लाइंग झोन कक्ष वन्यजीव उपचार केंद्रात करण्यात आला आहे. त्यामध्ये पक्षी किती उडू शकतो व किती वेळ हवेत राहू शकतो हे तपासले जाते त्यानंतरच त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडले जाते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
वन्यजीव उपचार केंद्रात आतापर्यंत शेकडो पशु, प्राणी यांच्यावर यशस्वीरीत्या उपचार करण्यात आलेले आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी प्राणी पक्षी जखमी अवस्थेत आढळल्यास नागरिकांनी ८६९८११२२११ या क्रमांकावर संपर्क साधावा
– सीमा मुसळे, वनपरिक्षेत्र अधिकारी