प्रत्येक जिल्ह्यात कीर्तन महोत्सव करणार; उद्योगमंत्र्यांची घोषणा
आळंदीतील सप्ताहात उद्योगमंत्री उदय सामंत

आळंदी : ‘मराठी भाषा अनुभवायची असेल तर प्रत्येकाने ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला पाहिजे. संत ज्ञानेश्वर माउलींचे आगामी वर्ष ७५१वा जन्मोत्सव असल्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या छपाईसाठी एक कोटीचा निधी मंजूर केला असून, पुढील वर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने कीर्तन महोत्सव करण्यात येईल,’ अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी आळंदीत केली.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५०व्या जन्मोत्सवानिमित्त आळंदीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले. या सप्ताहाला उदय सामंत यांनी सोमवारी (ता. ५) भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील आदी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा दिला. मात्र, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी राज्यमंत्री म्हणून पहिला प्रस्ताव मी केंद्राकडे पाठविला होता.’
हेही वाचा : उडणार इलेक्शनचा धुरळा!
इंद्रायणी शुद्धीकरण काम वर्षभरात सुरू करणार
‘आळंदीतील इंद्रायणी आणि पिंपरी-चिंचवडमधील पवना नदी शुद्धीकरणाचे ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला, हे आमचे भाग्य आहे. लोणावळा ते आळंदी इंद्रायणी नदीचे शुद्धीकरण एमआयडीसीमार्फत केले जाईल.
पुढील वर्षी नदी शुद्धीकरणाच्या कामास प्रारंभ होईल. पंढरपूरच्या वारीच्या वाटेवर वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास नातेवाइकांना मदतीबाबतच्या घोषणेची पूर्तता लवकरच केली जाईल. हे आश्वासन नाही तर शब्द आहे.’ असे सावंत म्हणाले.
मंत्र्यांनाही हरिनामाची गोडी
आळंदीतील सप्ताहात उद्योगमंत्री उदय सामंत आले. त्यावेळी कार्यक्रमस्थळी भागवत महाराज शिरवळकर यांचे कीर्तन सुरू होते. यावेळी मंत्री सामंत यांनी हातात टाळ घेऊन काही काळ कीर्तनाचा आनंद घेतला. त्यांच्यासमवेत पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे हेही हातात टाळ घेऊन होते.
दरम्यान उद्घाटनाच्या दिवशी शनिवारी (ता. ३) तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही वेळ ज्ञानेश्वरीचे पारायण केले. आता सोमवारी सामंत यांनी टाळाच्या तालावर ठेका धरला. एकंदर मंत्र्यांनाही अध्यात्मांची गोडी लागल्याचे दिसून आले.