ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

श्री जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ

श्री सप्तशृंगी देवी ट्रस्ट व प्रशासन यंत्रना सज्ज

नाशिक : श्री सप्तशृंगी मातेची मोठी बहीण समजली जाणाऱ्या व नवसाला पावणारी अशी अख्यायीका असलेल्या येथील जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवार ता. २२ पासून उत्साहात प्रारंभ होत असून नवरात्रोत्सवात जगंदबा मंदीरात सुमारे दीड हजारावर महिला भावीक नऊ दिवस घटी बसणार आहे. तसेच ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी श्री सप्तशृंगी देवी ट्रस्ट व प्रशासन यंत्रना सज्ज झाली आहे.

वणीची ग्रामदेवता असलेल्या जगदंबा मातेच्या शारदीय नवरात्र ता. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान तर कावडयात्रा ५ व ६ ऑक्टोबर रोजी भक्तीमय व मंगलमय वातावरणात संपन्न होत आहे. नवरात्रोत्सवा निमित्त श्री जगदंबा मंदिरा बरोबर संपूर्ण परीसरात आकर्षक विद्युत रोषनाई करण्यात आली आहे. सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. दरवर्षी जगदंबा देवी मंदिरासमोर सुमारे दिड हजार महिला भाविक नऊ दिवस घटी बसतात. त्यासाठी सप्तशृंगी देवी ट्रस्टने तयारी सुरू केली असून घटी बसणाऱ्या महिलांसाठी वॉटरप्रुफ सभामंडप टाकण्यात आला आहे.

मंदिराच्या शेजारी सुस्थितीत असलेल्या खोल्यांचाही निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसराची ट्रस्ट व ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी परिसर स्वच्छ केला आहे. मंदिराशेजारी असलेले तलाव स्वच्छ करण्यात आले आहे. भाविकांना स्नानासाठी तलावाच्या बाजूलाच जलवाहिनीद्वारे मुबलक पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविक व घटी बसणाऱ्या भाविकांसाठी अॅक्वागार्डद्वारे मुबलक शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने मंदिर, सभामंडप, मंदीरामागील भाग येथे ३६ छुपे कॅमेरे बसविण्यात आले असल्याची माहीती सप्तशृंगी देवी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, उपाध्यक्ष प्रविण देशमुख यांनी दिली आहे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

नवरात्रोत्सवात मंदिर व गावांत २४ तास वीजपुरवठा सुरळीत असावा यासाठी विज वितरण कंपनीच्या अधिका-यांना ट्रस्टने कळविले. घटी बसणाऱ्या महिलांची वैद्यकीय तपासणी व आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भाविकांना मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहीती विश्वस्त मनोज थोरात, अमोल देशमुख, लहानुबाई थोरात, पोपटराव थोरात यांनी दिली आहे. कायदा व सुव्यवस्था व भाविकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वणीचे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवानांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच गावातील सार्वजनिक उत्सव मंडळे, बसस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

नवरात्रोत्सवात वणी जगदंबा माता मंदिरात होणा-या कार्यक्रमाचे नियोजन

नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा, सकाळी नऊ वाजता आरती, दुपारी १२ वाजता नैवद्य आरती, सायंकाळी सहा वाजता देवीची सवाद्य पालखी, सात वाजता महाआरती याप्रमाणे मंदीरातील पुजाविधी संपन्न होतील. घटी बसलेल्या महिलांसाठी दररोज सकाळी १० वाजता फराळाची खिचडी वाटप केले जाणार आहे.

वणी येथील परंपरेनुसार प्रत्येक माळीचा मान हा प्रत्येक समाजाला देण्यात येतो त्यानुसार रोज तो मान देऊन पुजा विधी संपन्न होतो. पालखीचा मान देशमुख व थोरात कुटुबींयाकडे असतो यावेळचा पालखीचा मान ट्रस्टचे विश्वस्त गणेशदादा देशमुख यांच्या कुटूंबीयांकडे आहे.

तसेच देवी मंदीर सभामंडपात संगितमय श्रीमद् देवी भागवत सप्ताह दुपारी २ ते ५ या वेळेत संपन्न होणार असून नागपूर येथील केशव महाराज भुजाडे देवीभागवातीचे निरुपन करणार आहे. दररोज रात्री ८ ते ११ या वेळेत वेगवेगळ्या विवीध धार्मिक कार्यक्रम व प्रसिद्ध भजनी मंडळाचा भक्तीसंध्येचा कार्यक्रम होणार आहे.

महानवमीला मंदिर सभामंडपात रात्री साडेआठ वाजेपासून शतचंडी याग होईल. रात्री १२ नंतर कोहळ्याचा बळी देवून पूर्णाहूती देण्यात येणार येणार असल्याची माहीती विश्वस्त रमेश देशमुख, सुरेश देशमुख, गणेश देशमुख, रविंद्र थोरात, राकेश थोरात, रोशन जहागिरदार यांनी दिली आहे. नवरात्रोत्सवात पाच लाखांवर भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने भाविकांना सोयी सुविधा पुरविणेकामी ट्रस्ट चे विश्वस्त, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलिस व आरोग्य प्रशासन, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील असल्याची माहीत ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात यांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button