अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ?

सर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत. पण त्यांतल्या त्यांत समर्थांनी आपली जागा न सोडता, विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले. आमचा मुख्य रोग, संसार दु:खाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते हा आहे. रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार ? रोग असेल तसे औषध द्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल ? संसार ज्याला दु:खाचा वाटतो त्यालाच परमार्थमार्गाचा उपयोग ! एखादा दारू पिणारा मनुष्य दारूपायी आपले सर्वस्व घालवतो. दारूचा अंमल नसतो त्या वेळी तो शुद्धीवर येतो. आणि त्याला आपल्या बायको-मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते. पण त्याच्या बुद्धीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन: इतकी दारू पितो की त्यात त्याला स्वत:चा विसर पडतो; आणि अशा रीतीने त्यामध्येच तो स्वत:चा नाश करून घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्यापहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसांनंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते आणि म्हणून आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन: जोराने प्रपंच करू लागतो, आणि शेवटी हीन अवस्थेत मरून जातो.

हेही वाचा –  गावठाण क्षेत्रांचा होणार विस्तार बावनकुळे यांची माहिती

जो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वत:ला सांभाळून घेईल; पण जो स्वत:चा घात करून घेतो त्याला कोण सांभाळणार ? तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो, आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच तेच करीत असूनसुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही ? कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळविणे, सगळे तेच ! असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये ? याचे कारण असे आहे की, विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे, किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे; आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली. त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला. तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाही, हे मात्र और आहे.

बोधवचन:- जो मनुष्य प्रपंचातला आपला अनुभव जमेस धरत नाही, तो कशानेच शहाणा होत नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button