मुली व महिलांना कर्करोगावरील लस देणार : अजित पवार
महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे

पुणे : महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यावर, लस आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ही लस राज्यातील मुली व महिलांना देण्याबाबत महायुतीचे सरकार विचार करत आहे.
यामध्ये माझ्यासह आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग या सर्वच विभागाच्या मंत्रिमंडळाने लक्ष घातले आहे, ही लस देण्याबाबतची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे आयोजित राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत विशेष तपासणी मोहिमेचा शुभारंभ आणि राज्यस्तरीय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, दूरदृष्यप्रणीलीद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, शहरी आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर आदी उपस्थित होते.
पुढे पवार म्हणाले की, याअंतर्गत राज्यातील सर्व बालकांची डोक्यापासून नखा पर्यत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. यामाध्यमातून बालकांच्या आरोग्य विषयी माहिती मिळणार आहे. पहिल्याच टप्प्यात शारीरिक, मानसिक आजाराचे निदान होऊन त्यांच्यावर वेळेत मोफत उपचार करता येणार आहे. बालकांचे आरोग्य एखाद्या कुटुंबापुरते मर्यादित नसून ते समाज, देशाच्या उज्ज्वल भविष्याकरीता महत्त्वाचे असते.
दूरदृष्यप्रणीलीद्वारे मंत्री दादा भूसे म्हणाले, एकही विद्यार्थी उपचारापासून वंचित राहणार नाही, याबाबत शालेय शिक्षण विभागाने दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना होणाऱ्या आजारावर वेळेत उपचार होण्याकरिता आगामी काळात एक कक्ष स्थापन करण्याबाबत नियोजन करावे.
हेही वाचा – गावठाण क्षेत्रांचा होणार विस्तार बावनकुळे यांची माहिती
प्रकाश अबिटकर म्हणाले की, राज्य शासनाच्या १०० दिवसाच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सुमारे दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण जिल्हा रुग्णालय उप जिल्हा रुग्णालयाचेही लोकार्पण करून नागरिकांना अधिकाधिक आरोग्यविषयक सेवा देण्याचे काम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
आरोग्यमंत्र्यांनी दादांना दिला ‘ग्लुकोज’ चा डोस…
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर त्यांनी अजित दादांना गोड – गोड ग्लुकोज चा डोस दिला. ‘‘जेव्हा दादांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करतोय तेव्हा जबाबदारीही तितकीच असते. कारण दादा आणि दादांची शिस्त, त्यांच्या सूचना व त्यांच्या स्वभावानुसार काम नीटनेटके व पारदर्शी झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. त्यानुसार साजेसा उपक्रम करण्याचा प्रयत्न आहे’’ असे म्हणत आरोग्यमंत्र्यांनी दादांबाबत साखर पेरणी केली.
दादांनी दिले शिस्त पाळण्याचे ‘इंजेक्शन’
सर्व मंत्र्यांचे भाषण सूरू असताना मात्र व आरोग्य तपासणी करण्यासाठी आलेल्या व मंडपात समोर बसलेल्या हजारो शालेय विद्यार्थ्यांचा कलकलाट सूरू होता. अजित दादा भाषणाला उठण्यापूर्वी निवेदकाने अजित दादांचा उल्लेख ‘ज्यांच्याकडून शिस्त शिकायला हवी असे दादा’ असा केला. मात्र, समोरचा गोंधळ पाहून अजित दादा भाषण करायला उठले व त्यांनी ‘निवेदकाने जरी शिस्तीचा उल्लेख केला असला तरी शिस्त तर दिसत नाहीच. उलट गडबडच चालू आहे’ असा टोला अप्रत्यक्षपणे आयोजकांना लगावला.