‘पत्रकारांना आरोग्य सुविधा मिळण्याबाबत रुग्णालयांशी साधणार संवाद’; मुरलीधर मोहोळ

पुणे : समाजामध्ये घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब माध्यमांद्वारे नेमकेपणाने पोहोचवले जाते. माध्यमातील पत्रकारांनी वैयक्तिक आरोग्याकडे लक्ष देताना हाच नेमकेपणा साधायला हवा. अखंड कार्यरत राहताना आरोग्याची काळजी घेऊन वेळेत योग्य तपासण्या करण्यासाठी हेल्थ कार्डचा पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्चित फायदा होईल, असा विश्वास केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी व्यक्त केला. तसेच पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यविषयक सुविधा सवलतीच्या दरात मिळाव्यात, यासाठी पुण्यातील रुग्णालयांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासनही मुरलीधर मोहोळ यांनी दिले.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि क्रस्ना डायग्नोस्टिक्स यांच्यातर्फे पत्रकारांसाठीच्या हेल्थ कार्डचे वितरण मोहोळ यांच्या हस्ते झाले. क्रस्ना डायग्नोस्टिक्सचे अध्यक्ष राजेंद्र मुथा यावेळी उपस्थित होते. महापालिकेत स्थायी समितीचा अध्यक्ष असताना क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या सहकार्याने ज्येष्ठांसाठी विशेष उपचार मोहीम राबवण्यात आली होती. आत्तापर्यंत लाखो ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. करोनासारख्या महामारीच्या काळात योग्य माहिती पोहोचवण्यासाठी माध्यमे व त्यात काम करणारे पत्रकार कार्यरत राहिले होते. समाजासाठी अखंड झटणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी अशा स्वरूपाची ही विशेष मोहीम स्तुत्य आहे, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
हेही वाचा – सीईटी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
आधुनिक आणि अद्ययावत लॅबच्या माध्यमातून क्रस्नातर्फे आरोग्यविषयक अनेक चाचण्या व तपासण्या केल्या जातात. खात्रीशीर आणि अल्प दरातील या सुविधांचा फायदा आम्ही पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना करून देऊ शकलो, याचा आनंद आहे. आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास क्रस्ना डायग्नोस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक यश मुथा यांनी व्यक्त केला.
संघातर्फे राबवण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती भावे यांनी दिली. गुरव यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी जाधव- केदारी यांनी सूत्रसंचालन केले. तर, ज्ञानेश्वर भोंडे यांनी आभार मानले.