ताज्या घडामोडीविदर्भ

यंदा सप्टेंबर महिन्यात डेंग्यू व चिकनगुन्याने शहरासह ग्रामीण भागात कहर

डेंग्यू, चिकनगुन्याचे रुग्ण वाढण्यासाठी वातावरणातील बदल पोषक

अकोला : बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असून डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात डेंग्यू व चिकुनगुन्याने शहरासह ग्रामीण भागात कहर केला. सप्टेंबर महिन्यात २७ दिवसांमध्ये डेंग्यू व चिकनगुनियाचे तब्बल १८६ रुग्ण आढळले आहेत. खासगी रुग्णालयासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नीत सर्वोपचार रुग्णालयात डेंग्यू, चिकुनगुन्याचे रुग्ण वाढले आहेत.

सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे ९५ रुग्ण आढळून आले आहेत. तर चिकनगुनियाचे ९१ रुग्ण आढळून आले आहेत. गत तीन ते चार दिवसांमध्ये जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने हजेरी लावली. दरम्यान अधूनमधून होणारा पाऊस आणि हवामान बदलामुळे डासांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे डासांची प्रजनन क्षमता दुप्पट वाढल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रुग्णांची संख्या वाढली आहे. याला कारण म्हणजे वातावरणात होणारा बदल आहे. डेंग्यू, चिकनगुन्याचे रुग्ण वाढण्यासाठी वातावरणातील बदल पोषक ठरत आहे.

दवाखान्यांमध्ये सध्या ताप, सांधेदुखीचे रुग्ण येत असल्याने त्यांची तपासणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. १८६ रुग्ण आढळल्याची नोंद हिवताप विभागाकडे असली तरी शहरातील काही डेंग्यू व चिकनगुनियाची तपासणी करणाऱ्या लॅब रिपोर्टची लपवाछपवी करतात. त्यामुळे रुग्णांचा आकडा अधिक असल्याची दाट शक्यता आहे.

लक्षणे आजाराची, रिपोर्ट निगेटिव्ह
ताप येणे, अंग दुखणे, अंगावर पुरळ येणे यासह पेशींची संख्या कमी होणे आदी सर्व लक्षणे ही डेंगी आणि चिकनगुनिया या आजारांची आहेत. मात्र तपासणी केल्यानंतर काही रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. तसेच या नागरिकांची संख्या देखील नोंदविली जात नसल्याने आरोग्य विभागाद्वारे दिली जाणारी आकडेवारी कमी असल्याचे बोलले जात आहे.

रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली
सकाळी हवेत गारवा व दुपारी कडाक्याचे ऊन असे वातावरण सध्या आहे. तसेच अधूनमधून होणारा पाऊस, हे वातावरण डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक ठरत आहे. त्यामुळे साथीचे रुग्ण वाढत आहेत. सर्दी, ताप, खोकल्याचे घरोघरी रुग्ण आवळून येत असून, शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिकांना डेंग्यू सदृश्य तापाचा त्रास वाढला आहे.

मुलांची घ्या विशेष काळजी
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांच्यावर किटकजन्य आजारांचा लवकर ॲटक होतो. त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या शाळेच्या डब्यात ताजे अन्न व बाटलीत उकळलेले पाणी, आजारी असल्यास शाळेत पाठवू नका, तसेच घरीच उपचार न करता डॉक्टरांकडे घेऊन जावे, असा सल्ला डॉक्टर देतात.

डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांच्या रुग्णांमध्ये सप्टेंबरमध्ये वाढ झाली आहे. हिवताप विभागाकडून डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांवर गप्पी मासे सोडण्यात आली आहेत. डासांची उत्पती होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी व परिसरात स्वच्छता ठेवावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button