नागपूर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. श्वान आडवा आल्याने चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट रस्त्याच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने गाडीचे एअरबॅग उघडल्याने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणारे श्रीनिवास रेड्डी, श्लोक कोळमकर, पुष्पेंद्र गुप्ता आणि मोनाली टोपाल हे चौघे जण मुंबईवरून नागपूरला जात होते. सकाळी ६ वाजताच्या सुमारास मलकापूर पांग्रा नजीक चायनेज क्रमांक ३२६.२ जवळ असताना अचानक त्यांच्या गाडीसमोर श्वान आलं. त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट कठड्याला जाऊन धडकली.
‘समृद्धी’वर अपघातात संभाजीनगरचे दोघे ठार; चौघे गंभीर जखमी सर्व ‘बसप’चे कार्यकर्ते
सुदैवाने गाडीतील चारही जणांनी सीटबेल्ट लावले असल्याने एअरबॅग वेगळे उघडले आणि जीवितहानी टळली. मात्र, या अपघात कारमधील तीन जण जखमी झाले. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या इंजिनाचे दोन तुकडे होऊन समोरची चाके बाजूला जाऊन पडली. या अपघातामुळे सकाळी या मार्गावरील वाहतूक मंदावली. मात्र, नंतर ती पूर्ववत करण्यात आली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांना तत्काळ घटनास्थळी दाखल होत, जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दोन दिवसांपूर्वीही समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही समृद्धी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. यावेळी ट्रकने पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसला जोरदार धडक दिली होती. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर १५ प्रवासी जखमी झाले होते.
समृद्धी हायवेवर कारला अपघात;दोन गंभीर जखमी, कारली गावानजीकची घटना
ही घटना अमरावतीच्या जवळ असणाऱ्या धामणगावजवळ पहाटेच्या सुमारास घडली होती. या अपघातानंतर जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, समृद्धी महामार्गावर सतत होणाऱ्या अपघतांमुळे आता प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





