मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात आगीत मिनीबस जळून खाक!
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
लोणावळा : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटात एका खाजगी प्रवासी मिनी बसला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली असून, घटनेमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

बोरघाट (दस्तुरी) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुविधा ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्रमांक- एम एच-४७/एएस-०७७९) हि दहिसर, मुंबई येथून लोणावळ्याला ३० प्रवासी घेऊन चालली होती. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील दस्तुरी गावच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक ४२/४०० येथे बसला शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच बस चालक असिफ बशीर केनिया याने प्रसंगावधान राखत बस मार्गाच्या सर्व्हिस मार्गिकेवर घेऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि बसला भीषण आग लागली.

बसला आग लागल्याची माहिती कळताच बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक गजानन म्हात्रे, अनिल शिंदे व त्यांचे सहकारी तसेच देवदूत आपत्कालीन पथक, खोपोली पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी करून आग विझवण्यासाठी आयआरबी व खोपोली नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला प्राचारण करण्यात आले. तोपर्यंत मात्र भीषण आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली होती. दोन्ही अग्निशमन बंबाच्या सहाय्याने उर्वरित आग विझविण्यात आली. संपूर्ण आग विझविण्यात आल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यात आली. यादरम्यान मुंबई पुणे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस करीत आहेत.





