पंतप्रधान मोदी 11-12 मार्च रोजी मॉरिशस दौऱ्यावर, राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित

Pm modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारपासून मॉरिशसच्या दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. २०१५ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच मॉरिशस दौरा असेल, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी काल संध्याकाळी नवी दिल्लीत माध्यमांना माहिती देताना सांगितले.
भारताचे मॉरिशसशी असलेले संबंध सामायिक इतिहास, संस्कृती आणि अनेक शतकांपासूनचे अतिशय मजबूत लोक-ते-लोक संबंधांमध्ये रुजलेले आहेत. मॉरिशस हा हिंदी महासागरातील भारताच्या प्रमुख भागीदारांपैकी एक मित्र देश आहे आणि जवळचा सागरी शेजारी आहे. भारताची मॉरिशससोबत मजबूत विकास भागीदारी आहे. गेल्या दहा वर्षांत दोन्ही देशांमधील संबंध लक्षणीयरीत्या दृढ झाले आहेत. या भेटीमुळे दोन्ही बाजूंना द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेता येईल, असेही मिस्री यांनी सांगितले.
हेही वाचा – चऱ्होलीच्या शहरीकरणावर डाक विभागाचा ‘स्टँम्प’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ही या भेटीची विशेषता आहे. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनानिमित्त आयोजित संचलनामध्ये भारतीय संरक्षण दलांचा एक तुकडी, भारतीय नौदलाचे एक जहाज आणि भारतीय हवाई दलाचे आकाश गंगा स्कायडायव्हिंग तुकडी सहभागी होणार आहे.
पंतप्रधान मंगळवारी सकाळी लवकर पोर्ट लुईस येथे पोहोचतील पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान आणि मॉरिशसचे संस्थापक पिता सीवूसागुर रामगुलाम तसेच मॉरिशसचे माजी अध्यक्ष आणि पंतप्रधान सर अनिरुद्ध जगन्नाथ यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर सीवूसागुर रामगुलाम बोटॅनिकल गार्डनला भेट देतील. या भेटीदरम्यान, पंतप्रधान मोदी मॉरिशसचे अध्यक्ष धरमबीर गोखूल यांची भेट घेतील, पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांची भेट घेतील आणि मॉरिशसमधील वरिष्ठ मान्यवर आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांशी भेट घेतील.