ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

पाकमधील ‘सिक्रेट किलर’ ने ठोकले १५ जहाल दहशतवादी !

पाकिस्तानमधील दहशतवादी तयार करणारी जहाल संघटना म्हणजे लष्कर-ए-तोयबा ! शेकडो युवकांना ताब्यात घ्यायचे..त्यांना दहशतवादी प्रशिक्षण द्यायचे आणि हातामध्ये अत्याधुनिक शस्त्रे देऊन त्यांना काश्मीरमध्ये किंवा भारतात पाठवायचे, हे प्रामुख्याने या दहशतवादी संघटनेचे उद्योग ! अशा या संघटनेचा एक म्होरक्या पाकिस्तानात टिपला गेला आणि समोर चर्चा सुरू झाली ती ‘सिक्रेट किलर’ची.. अर्थात्, अज्ञात हल्लेखोराची!

‘सिक्रेट किलर’ चा दणका..

पहलगाममध्ये हिंदूंवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ हाती घेऊन पाकव्याप्त काश्मीर आणि प्रमुख शहरांमध्ये सुरू असलेली दहशतवादी केंद्रे उद्ध्वस्त केली. त्या कारवाईत किमान दीडशे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे पाकिस्तानने कबूल केले आहे. भारताच्या हल्ल्याच्या भीतीने बहुतेक दहशतवादी पाकिस्तानच्या अन्य भागात आश्रयाला गेले आहेत. ‘सिक्रेट किलर’ चा त्या ठिकाणी मोठा बोलबाला असून त्याचा शोध आता पाकिस्तान घेत आहे.

‘सिक्रेट किलर’ चा आश्रयदाता कोण?

भारताने दहशतवाद्यांचे अड्डे या महिन्यात उद्ध्वस्त केले आहेत, परंतु हा ‘सिक्रेट किलर’ गेले काही महिने पाकिस्तानात सक्रिय असून त्याने आत्तापर्यंत अतिशय जहाल अशा पंधरापेक्षा जास्त दहशतवाद्यांना ठोकले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना भारताबरोबरच या ‘सिक्रेट किलर’ ची जबरदस्त भीती आहे. त्याचा ‘गॉडफादर’ कोण, याचाही आता शोध सुरू झाला आहे.

दहशतवाद्यांची यादी दिली.. पण,

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर दहशतवाद संपवण्याची मोहीम भारताने हाती घेतली आणि पाकिस्तानला कट्टर दहशतवाद्यांची यादी सोपविधी.. त्यामध्ये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम, अझर मसूद, हाफिज सईद, सलाउद्दीन या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्या, असे पाकिस्तानला सुनावले. पण, पाकिस्तान सरकारवरच दहशतवाद्यांचा एवढा कब्जा आहे, की त्यांच्या लष्कराच्या पाठिंब्यावर हेच दहशतवादी सरकार चालवतात की काय अशी शंका यावी !

हेही वाचा –  वैष्णवी हगवणे कुटुंबीयांच्या भेटीनंतर नीलम गोऱ्हेंनी महिला आयोगाला दिला ‘हा’ सल्ला

सैफुल्लाह खालिदचा खात्मा..

दहशतवादाचे काय करायचे, याचे पूर्ण नियोजन सुरू असतानाच अचानक एक बातमी येऊन टपकली..सैफुल्लाह खालीदचा खात्मा ! एका अज्ञात मारेकर्‍याने त्याला ठार केल्याचा पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात आले. हा ‘सिक्रेट किलर’ कोण ? याचा सुगावा मात्र कोणालाच लागला नाही. नंतर सांगण्यात आले, की आतापर्यंत १५ पेक्षा अधिक क्रूर दहशतवाद्यांना या ‘सिक्रेट किलर’ ने यमसदनी पाठवले आहे. पाकमधील सिंध प्रांतात रविवारी रात्री ‘लष्कर- ए- तोयबा’ चा टॉप कमांडर सैफुल्लाह खालिदला अज्ञात हल्लेखोराने ठार केल्याच्या वृत्ताने संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरून गेले.

खालीदचे मुख्यालय नेपाळमध्ये..

दहशतवादी खालिद दीर्घकाळापासून नेपाळमधून दहशतवादी कारवाया हाताळत होता. परंतु, हत्येच्या वेळी तो सिंध प्रांतात रजाउल्लाह नावाने लपून राहिला होता. भारतात झालेल्या तीन मोठ्या हल्ल्यात खालिदचा समावेश होता. त्यामध्ये भारताच्या संसदेवर झालेल्या हल्ल्याचाही समावेश आहे, हे एक वैशिष्ट्य!

भारतात हिंसाचाराचे मोठे ‘टास्क’..

पाकिस्तानच्या लष्कराने खालिदला भारतात हल्ल्याची तयारी करण्याचा ‘टास्क’ दिला होता. त्याला आधुनिक शस्त्रास्त्रे देखील पुरवण्यात आली होती. त्यानंतर तो नेपाळमध्ये अनेक वर्ष आपला तळ बनवून तिथून भारतात हल्ल्याची तयारी करत होता. परंतु, जेव्हा भारताच्या गुप्तचर यंत्रणेला याची माहिती मिळाली, तेव्हा तो नेपाळमधून पळून पाकिस्तानात जाऊन लपल्याचे लक्षात आले होते. तसे पाहिले तर खालिद हा भारताचा पहिला ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवादी नक्कीच नाही, तरीपण तो भारताला पाहिजेच होता, हे निश्चित! याआधीही अशाच ‘सिक्रेट किलर’ने भारताचे अनेक शत्रू आणि कट्टर दहशतवाद्यांना याच पॅटर्नने ठार केले आहे.

हल्लेखोर अज्ञात, दहशतवादी खल्लास..

थोडासा विचार केला तर नक्की लक्षात येईल, की गेल्या काही महिन्यात पाकिस्तानात १५ पेक्षा अधिक दहशतवादी अज्ञात हल्ल्यात ठार झालेत. विशेष म्हणजे, त्यातील बहुतांश दहशतवादी भारतातील हल्ल्यात सहभागी होते. हे दहशतवादी लष्कर ए तोयबा, जैश ए महम्मद तसेच हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या दहशतवादी संघटनेत सहभागी होते. त्यातील एक मोठे नाव अबू कताल जो सर्वात जहाल दहशतवादी मानला गेला होता. जम्मू – काश्मीरातील अनेक हल्ल्यात त्याचा सहभाग होता. याचवर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानात झेलम परिसरात त्याला अज्ञात हल्लेखोरांनी ठार केले. ‘एन आय ए’ च्या यादीत तो मॉस्ट वॉन्टेड दहशतवादी होता.

शाहिद लतीफ आणि अदनान अहमद..

अज्ञाताच्या अशाच काही हल्ल्यात शाहिद लतीफ आणि अदनान अहमदही मारले गेले होते. सध्या भारताच्या हिटलिस्टवर सर्वात अग्रस्थानी असलेल्या हाफिज सईदचा हा अत्यंत जवळचा आणि लष्करातील टॉप कमांडर होता. डिसेंबर २०२३ मध्ये कराचीत अज्ञात हल्लेखोरांनी त्याची हत्या केली होती.

हाफिज सईद चे उजवे – डावे..

हाफीज सईदचा जवळचा दहशतवादी आणि पॉलिटिकल विंगचा नेता मौलाना काशिफ अली हा देखील अशाच अज्ञाताच्या हल्ल्यात मारला गेला. फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वात त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. मुफ्ती शाह मीर यालाही मार्च २०२५ मध्ये बलुचिस्तान येथील तुरबत शहरात अज्ञातांनी गोळी झाडून ठार केले.

कुलभूषण जाधव चा अपहरणकर्ता

मुफ्ती शाह मीर याच्यावर कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात मदत केल्याचा आरोप होता. रहिमुल्ला तारीक, अकरम गाजी, ख्वाजा शहीद, मौलाना जियाउर रहमान, बशीर अहमद, जहूर इब्राहिम, मेजर दानियाल, परमजित सिंह पंजवर, कारी एजाज आबिद, दाऊद मलिक यासारखे अनेक दहशतवादी पाकिस्तानात अज्ञात हल्लेखोरांच्या हल्ल्यात ठार झाले आहेत.

चर्चा फक्त ‘सिक्रेट किलर’ ची..

पाकिस्तानी सैन्याची जबरदस्त सुरक्षा असलेल्या अनेक जहाल दहशतवाद्यांचा अशा पद्धतीने कोणी खात्मा करत असेल, तर चर्चा फक्त त्या अज्ञात हल्लेखोराची म्हणजेच ‘सिक्रेट किलर’ ची आहे आणि त्याचा गॉडफादर कोण ? हेही जाहीरपणे विचारले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button