Operation Sindoor | भारत-पाकिस्तान सीमेजवळ ‘ऑपरेशन सिंदूर’ स्मृति उद्यान उभं राहणार

Operation Sindoor | २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला. भारतानं या हल्ल्याचा सूड म्हणून ७ मे रोजी पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ या सर्व घडामोडींनंतर आता भारत-पाकिस्तान सीमेजवळ याच ऑपरेशन सिंदूरच्या स्मृतीप्रीत्यर्थ गर्द झाडींचं एक उद्यान उभारलं जात आहे. या उद्यानाला ‘सिंदूर वन’ असं नाव देण्यात आलं आहे.
गुजरात सरकारनं हे उद्यान तयार करत असल्याचं जाहीर केलं आहे. हे उद्यान भारत-पाकिस्तान सीमेजवळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात उभारलं जाणार आहे. या ठिकाणी सीमेपलीकडून पाकिस्तानी लष्करानं हल्लेदेखील केले होते. येत्या एक ते दीड वर्षात हे स्मृतिस्थळ उद्यान तयार होणार असून उद्यानाचं काम सुरू करण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! राज्य शासनाचा ‘GR’ प्रसिद्ध!
“ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय समाज, आर्मी नौदल, हवाई दल, बीएसएफ आणि इतर यंत्रणांनी दाखवलेल्या एकतेचं प्रतीक म्हणून हे स्मृतीउद्यान उभारण्याचं नियोजन वनविभागानं केलं आहे”, अशी प्रतिक्रिया कच्छचे जिल्हाधिकारी आनंद पटेल यांनी दिली आहे. हे उद्यान कच्छ जिल्ह्यातील मीरजापर गावात उभारले जाईल आणि ते ८ हेक्टर क्षेत्रात विस्तारले जाईल. या उद्यानातील प्रत्येक हेक्टरमध्ये १०,००० झाडे लावण्याची योजना आहे.