दक्षिण पश्चिमच्या कार्यकर्त्यांकडून सहकार्य नाही! ; फडणवीसांसमोरच गडकरींची जाहीर नाराजी
![No cooperation from South West activists! ; Gadkari's public displeasure in front of Fadnavis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/devendra-fadanvis-1-780x461.jpg)
नागपूर : अपंग व व ज्येष्ठ नागरिकांना साधने वितरण उपक्रमासाठी दक्षिण पश्चिम आणि पश्चिम नागपूर मतदार संघातील कार्यकर्त्यांनी नी काम केले नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली तर दक्षिण नागपुर मतदार संघातील कार्यकर्त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिमचे आमदार देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्ती करणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दक्षिण पश्चिम आणि पश्चिम मतदार संघातील अपंग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात आले त्यावेळी गडकरी बोलत होते. रामदासपेठ येथील पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला माजी आमदार सुधाकर देशमुख, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी विपीन इटनकर , शहर अध्यक्ष प्रवीण दटके आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, शहरातील सहा मतदार संघात ही योजना राबविण्यासाठी प्रशासनाने चांगले काम केले.
दक्षिण नागपुरात आमदार मोहन मते यांच्या नेतृत्वाखाली तेथील नगरसेवकांनी चांगले काम केले. त्यामुळे त्यांना शंभरपैकी ९० टक्के गुण तर दक्षिण-पश्चिम आणि पश्चिम नागपुरातील मतदार संघातील कार्यकर्त्यानी कामच केले नसल्यामुळे त्यांना ५० टक्केपेक्षा कमी गुण दिले जाईल असे सांगत गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच त्यांच्या मतदार संघातील कार्यकर्त्याबाबत नाराजी व्यक्त केली. खरे तर दोन मतदार संघ मिळून दहा हजार लोकांनी या योजनेचा फायदा घेणे अपेक्षित होते पण ते दिसत नाही. त्यामुळे कोणी किती काम केले हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वत:च्या मनाला विचारा असा उपदेश करत कार्यकर्त्याचे कान टोचले. या कार्यक्रमाचा उद्देश हा राजकीय नाही. लोकांची सेवा केली तर त्यांच्यापुढे छायाचित्र घेऊन जाण्याची वेळ येणार नाही. लोकांच्या सेवेतून मत मिळवले पाहिजे असे सांगत त्यांनी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे सुनावले.