नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीतील पहिला बळी
रुग्णालयात उपचार सुरु असताना तरुणाचा मृत्यू

नागपूर : नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीतील पहिला बळी गेला आहे. या दंगलीत गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचा नागपूरच्या मेयो रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यामुळं रुग्णालय परिसरात तणावाची परिस्थिती असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
इरफान अन्सारी (वय ४०) असं या दंगलीत बळी गेलेल्या तरुणाचं नाव आहे. तो नागपूरच्या वंदे नवाज नगरचा रहिवासी होता. सोमवारच्या रात्री (दि. १७ मार्च २०२५) ११ वाजण्याच्या सुमारास इरफान हा इटारसीला जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडं आटोरिक्षानं निघाला होता. गीतांजली थेटर चौकात हिंसाचार सुरु असल्यानं ऑटो चालकानं त्याला पुढे सोडण्यास नकार दिला. त्यानंतर इरफान अन्सारी रेल्वे स्थानकाकडं जाण्यासाठी पायी निघाला असताना जमावानं त्याला घेरलं आणि त्याच्यावर शस्रांनी वार केले.
या हल्ल्यात इरफानला गंभीर दुखापत झाली होती, त्याचा डोक्यावर, पाठीवर घाव होते. गंभीर जखमी अस्वस्थेत तो पोलिसांना दिसल्यानं त्यांनी त्याला इंदिरागांधी रुग्णालयात अर्थात मेयो रुग्णालयात भरती केलं. या ठिकाणी गेल्या सहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते, आज, शनिवारी त्याची मृत्यूशी झुंज अखेर थांबली, अशी माहिती इरफानचा भाऊ इमरान अन्सारी यांनी पत्रकारांनी बोलताना दिली.
हेही वाचा – श्री विघ्नहर साखर कारखान्याला नॅशनल फेडरेशनकडून उत्कृष्ठ ऊस विकास पुरस्कार जाहीर
मृत तरुणाच्या भावाचा आरोप?
मृत तरुण इरफान अन्सारी याच्यावर 50 ते 60 लोकांच्या जमावानं हल्ला चढवला, त्याला बेदम मारहाण केली, शस्त्रांनी वारही त्याच्यावर करण्यात आले. त्यामुळं गंभीररित्या जखमी झाल्यानं त्यातच त्याचा मृत्यू झाला. माझ्या भावाच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी इरफानचा भाऊ इम्रान अन्सारी यानी केली आहे.