भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला वसंतदादा पाटील पुरस्कार जाहीर
केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये केली.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. दरम्यान, उत्कृष्ट ऊस उत्पादकता गटामधील पहिला पुरस्कार जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला, तर द्वितीय सांगलीमधील क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड शेतकरी सहकारी साखर कारखान्याला आणि तृतीय पुरस्कार सुरतच्या श्री महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योगला जाहीर झाला आहे.
हेही वाचा – ‘दंगलखोरांकडून झालेल्या नुकसानीची भरपाई वसूल करणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२५ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील दहा साखर कारखान्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्याखालोखाल तमिळनाडूला पाच, उत्तर प्रदेशला चार, गुजरातला तीन, तर पंजाब, हरियाना आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका कारखान्याला पुरस्कार मिळाला आहे.