नागपूरच्या १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात
रुग्णसेवा जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता, १५४ नव्या पदांना मंजुरी

नागपूर : तब्बल बारा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या १०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले आहे. विविध पदांना प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. जूनमध्ये रुग्णालय सेवेत दाखल होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ मिळताच इमारतीत रुग्ण सेवा सुरू होईल.
रुग्णालय कार्यान्वित होताच ग्रामीण भागांतील रुग्णांची सोय होणार आहे. सर्व आधुनिक सुविधांसह, रुग्णालयात स्वतंत्र ट्रॉमा केअर सेंटर देखील सेवेसाठी सज्ज असेल. त्यासाठी आणखी १९७ वाढीव पदांच्या मंजुरीबाबत प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिले.
प्रादेशिक मानोरुग्णालय परिसरात साकारण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. सीएस कार्यालयाचे जूनपर्यंत स्थलांतरण होऊ शकेल, त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय हे सिव्हिल सर्जनच्या अखत्यारित येईल. त्याच इमारतीतील वेगळ्या इमारतीत कार्यालय हलवले जाईल.
हेही वाचा – आळंदीत माऊलींच्या मंदिरात श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी
सध्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय वर्षानुवर्षे मेयो महाविद्यालय परिसरात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने अध्यादेश जारी करून एकूण १९७ पदांना मान्यता दिली. त्याची नियुक्ती प्रक्रिया आता मे महिन्यात सुरू होईल. यानंतर जिल्हा रुग्णालय रुग्ण सेवेत दाखल होईल. सरकारने एकूण पदांपैकी ८९ पदे आउटसोर्स करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वतंत्र ट्रॉमा सेंटरही सेवेत
जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपसंचालकांमार्फत आरोग्य सेवा आयुक्तांना पाठवलेल्या नवीन पदांच्या प्रस्तावात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र आणि बालरोग, मानसोपचारतज्ज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, ९ अधिपरिचारिका, ३३ परिचारिका, १३ ओटी अटेंडंट, १० वॉर्ड बॉय, २३ सफाई कर्मचारी आणि इतर पदांचा समावेश आहे. सर्व पदे फॉरमॅटनुसार मागवण्यात आली आहेत. रुग्णालयातील क्रिटिकल केअर विभागात १८ जणांचा समावेश असेल. त्याच नवजात शिशु अतिदक्षता विभागात १०, मानसोपचार कक्षात २०, अपंग पुनर्वसन कक्षात ४, ट्रॉमा केअर युनिटमध्ये १५ आणि सीटी स्कॅन विभागात ९ जणांची भरती होणार आहे.
या आधीच १९७ पदांना मान्यता
एकूण २५१ पदे भरणार
८९ पदे आउटसोर्सिंगद्वारे
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
यापूर्वी मंजूर १९७ पदांच्या भरवशावर जिल्हा रुग्णालय सेवेत दाखल करणे जोखमीचे आहे. यासाठी आणखी वाढीव १५४ पदांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. विभागाकडून लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. जूनपासून रुग्णालय सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे. मेयोतील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय लवकरच नव्या इमारतीत स्थलांतरित होईल.
– डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक