मोमोज कारखान्यावर छापा ,फॅक्ट्रीच्या फ्रिजमध्ये कुत्र्याचे शीर,धक्कादायक बातमी
कारखान्यात वापरण्यात येणारी कोबी पूर्णपणे खराब, बुरशी लागली,भांडी वॉशरूममध्ये ...

पंजाब : तुम्हीही मोमोज आणि स्प्रिंग रोल खाण्याचे शौकीन असाल तर सावधान. मोमोजप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका मोमोज कारखान्यावर छापा टाकला असता धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. तिथे कुजलेल्या भाज्या, बुरशी लागलेली कोबी आणि खराब झालेले तेल यांपासून मोमोज बनवले जात होते. एवढेच नाही तर मोमोजच्या मसाल्यातही किडे सापडल्याचे समोर आले आहे. यासोबतच फ्रीजमध्ये एका प्राण्याचे छिन्नविछिन्न शीर सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याशिवाय कारखान्यातील भांड्यांमध्ये काही प्रमाणात मांसही सापडले असून ते पोलिसांनी जप्त केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा हा व्हिडीओ पंजाबमधील मोहाली येथील आहे. या भागातील एका कारखान्यातून बाहेर पडणारा कचरा पाहून लोकांना संशय आला. आत जाऊन पाहिलं तर परिस्थिती अतिशय भयावह होती. घाणीत मोमोज आणि स्प्रिंग रोल बनवले जात होते. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने कारवाई केली आहे.
हेही वाचा : हवा प्रदूषणासाठी कारणीभूत दोन आरएमसी प्लँट चालकाला ‘दणका’
या कारखान्यात वापरण्यात येणारी कोबी पूर्णपणे खराब झाली होती. तिला बुरशी लागली होती. भांडी वॉशरूममध्ये ठेवली होती आणि वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरले जात होते. गलिच्छ आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात तयार होणारे मोमो आणि स्प्रिंग रोल शहरभरातील गाड्या आणि दुकानांना पुरवले जात होते. या संशयास्पद हालचालींची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली. जप्त करण्यात आलेल्या डोक्याची ओळख पटवण्यासाठी ते पशुवैद्यकीय विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभाग सतर्क झाले आहेत. कारखान्यात तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांचीही चाचपणी केली जात आहे. पोलिसांनी कारख्यान्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच कारखाना मालक व इतर कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.