Good News : तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल ३ हजार २२० रुपये जाहीर: आमदार डॉ.विनय कोरे
सहकारमहर्षी विश्वनाथ आण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांच्या ३० व्या पुण्यस्मरण दिनी घोषणा
![MLA Dr. Vinay Kore said that the first withdrawal of Tatyasaheb Kore Warna Cooperative Sugar Factory was announced at Rs. 3,220.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Vinay-Kore-780x470.jpg)
सांगली | श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये गळीतास येणाऱ्या ऊसास प्रतिटन ३२२०/- रुपये प्रमाणे पहिली उचल देणेचा निर्णय सहकारमहर्षी विश्वनाथ आण्णा तथा तात्यासाहेब कोरे यांच्या ३० व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतलेचे कारखान्याचे चेअरमन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले.
तसेच, गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये मार्च महिन्यात येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३४००/- रुपये दर देणार असलेचे तसेच कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केलेप्रमाणे बुलेट व स्प्लेंडर मोटर सायकलच्या लकी ड्रॉ ची प्रोत्साहनपर बक्षीस योजना याहीवर्षी चालू राहणार असलेचे व सर्व सभासद, ऊस उत्पादकांची दिवाळीही गोड करणार असल्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सांगितले.
हेही वाचा – ‘जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही..’; नवनीत राणा यांची टीका
तसेच चालू गळीत हंगामात यापुढेही सर्व सभासद व गेटकेन ऊस पुरवठादार यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस वारणा कारखान्यास पुरवठा करुन गाळपाचे १६ लाख मे. टनाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी केले. यावेळी या बैठकीस कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सर्व संचालक सदस्य, कार्यकारी संचालक शहाजीराव भगत, सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
गळीत हंगाम सहवीज निर्मिती प्रकल्प…
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याने ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना नेहमीच चांगला ऊस दर दिला असून शेतकऱ्यांसाठी अनेक विविध योजना राबविलेल्या आहेत. कारखान्याचा चालू गळीत हंगामात वेळेत गाळप होवून साखर उतारा चांगला राहण्याचे दृष्टीने शेतकरी सभासदांच्या सहकार्यातून यावर्षीचा ६६ वा गळीत हंगाम सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या सहकार्यातून सुरू झाला आहे. या हंगामात कारखान्याने आजअखेर एकूण २, ४६,९१५ मे.टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत सर्व ऊस उत्पादक सभासद बंधू-भगिनींनी व गेटकेन ऊस उत्पादकांनी सुरुवातीपासूनच ऊस गळीतास पाठवून मोलाचे सहकार्य केले आहे याबद्दल आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्यासह संचालक मंडळाने सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.