कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, 2 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी
सांगली ।
राज्याचे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सुखरूप आहेत. विश्वजीत कदम यांचा ताफा सांगली येथील पलूस तालुक्यातील नागठाणे अंकलखोप गावामध्ये पाहणी करण्यासाठी जात होता. जाताना हा अपघात झाला आहे. मात्र, या अपघातात 2 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राज्यभर पावसाने धुडगूस घातलं आहे. यामुळे सांगली आणि कोल्हापूरमध्ये जलप्रलय झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम हे आपल्या मतदारसंघातील सांगलीतील अंकलखोप या ठिकाणी गाडीतून जाताना पूर परिस्थितीची पाहणी करत होते. त्या दरम्यान अचानक गावातील एक अज्ञात त्यांच्या ताफ्याच्या आडवा आला. त्याच्या बचावासाठी ताफ्यातील एका गाडीचा ताबा सुटला. ती गाडी रस्त्याच्या पलीकडे जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडी थेट रस्त्याच्या बाजूला जाऊन जोरात कलटी झाली आहे. विश्वजीत कदम हे सुखरूप असून ड्रायव्हर आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.





