ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

माधुरी हत्तीणीला मोकळा श्वास घेता येईल, तेथे ठेवा !

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीच्या वास्तव्यावरून सध्या जोरदार उलट सुलट चर्चा सुरू आहे. हे प्रकरण आता एवढ्या थराला जाऊन पोहोचले आहे की त्यावर कोल्हापुरात मोर्चे निघाले आहेत आणि थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधितांची, आमदारांची खासदारांची बैठक घेऊन उचित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे !

संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट !

माधुरी हत्तीणीला गुजरातमधील ‘वनतारा’ या प्राण्यांच्या रुग्णालयामध्ये हलविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला, त्यानुसार तिला हलवण्यात आले. पण, प्रत्यक्षात तेथील स्थानिक मंडळींनी जो गोंधळ घातला आहे, क्षणोक्षणी भूमिका बदलल्या आहेत, त्याला जबाबदार कोण ? ही हत्तीण पुन्हा नांदणी मठाला मिळावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल आणि तशी याचिकाही दाखल करेल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सर्वांनी निःश्वास टाकला. त्यामुळेच, नेमके हे प्रकरण काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

गंमत फारच भारी आहे..

या संपूर्ण प्रकरणात जो काही हलगर्जीपणा आहे, त्याचे प्रथम विश्लेषण करू या. हे पुरावे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि त्यांचे धर्मबांधव असलेले मठ अधिकारी यांनी स्वतःच नकळत पुरवले आहेत, हे सर्वांनी लक्षात घ्या. ते मुळामध्ये या हत्तीणीला झटकू पाहत होते, आणि ती नांदणी मध्ये नको म्हणून त्यासाठी प्रयत्न करत होते, नंतर हीच मंडळी हत्तीण गेल्यानंतर टाहो फोडत आहेत, असेच दुर्दैवाने म्हणावे लागते!

‘पेटा’ ने पुरावे घशात घातले..

मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासंदर्भात, कोणी कुठे अडकले असल्यास त्याला सोडवण्यात आणि प्राण्यांचे जीवन सुसह्य व्हावे म्हणून ‘पेटा’ ही संघटना कार्यरत आहे. त्यांनीच पत्रकारांना पुरावे दिले असून कायद्याची जाण असणारे यावर आणखी प्रकाश टाकू शकतील. पण, या प्रकरणात राजकारण करणाऱ्यांचा बुरखा मात्र या ‘पेटा’ ने टराटरा पडला असून सर्व पुरावे त्यांच्या घशात घातले आहेत!

हेही वाचा –  लाडक्या बहि‍णींना 12 वा हफ्ता कधी मिळणार; मंत्री आदिती तटकरेंनी दिली माहिती

पुरावे वाचा सविस्तरपणे !

१) माधुरी तीन वर्षाची असताना तिला तिच्या आईपासून वेगळे करून मठात आणले गेले.

२) दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीणीने एका मठ पदाधिकाऱ्याला ढकलून ठार मारले .

३) जवळपास दोन महिने सतत फाॅलोअप घेऊन शेवटी माजी खासदारांचा वेळ मिळाल्यावर मठाच्या सर्व ट्रस्टीनी राजू शेट्टींची भेट घेतली. दि. ७ एप्रिल २०१८ ला ‘आम्हाला हत्ती संभाळायला येथून पुढे जमेना झालाय’ असे पत्र मठाने राजू शेट्टींना दिले .

४) दि. ७ एप्रिल २०१८ रोजीच शेट्टी यांनी ते पत्र पुढे वन खात्याला पाठवले आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला कल्पना देऊन त्याबद्दल पाठपुरावा केला.

५) २०१८ ते २०२० पर्यंत तो हत्ती खपावा, म्हणून राजू शेट्टी यांनी ‘पेटा’ चे वकील खुशबु गुप्ता यांबरोबर हत्ती दाखवणे, त्याच्या जखमा मोजणे, तो म्हातारा झालाय, याचे सर्टिफिकेट देणे, ‘पेटा’ च्या वकीलांना जैन मठातील लोकांशी भेटी घङवून तो हत्ती न्यायला लागेल, अशा मुलाखती घेणे. ‘पेटा’ च्या पुरावा गटाला मठातील सर्व सोयी, गैरसोयी यांचे सविस्तर फोटो आणि व्हिडिओ काढून द्यायची परवानगी देणे वगैरे सगळे प्रकार बिनबोभाट केले.

६) खऱ्या अर्थाने ‘गेम’ सुरू होतो येथूनच ! अचानक का कुणास ठाऊक, पण या सगळ्यातून अचानक मठाला, राजु शेट्टीना एक नवी संधी दिसू लागते.
२०२० पर्यंत खपवायचा हत्ती, आता नवी संधी घेऊन आला होता..आणि त्यात या मठातील तसेच राजू शेट्टी यांच्यासारखी चाणाक्ष मंडळी लक्ष घालून लागली संधीचे सोने करण्यासाठी !

भाड्याने हत्ती देण्याचा धंदा..

या सर्व प्रकारानंतर अचानक २०२१ पासून २०२४ पर्यंत तो हत्ती बेकायदेशीररीत्या ट्रान्सपोर्ट करून चौदा वेगवेगळ्या ठिकाणी चार ते पाच लाख रुपये घेऊन भाड्याने पाठवण्याचा नवा धंदा सुरू झाला, या सर्वांच्या आशीर्वादाने.. त्यातून त्यांनी बक्कळ कमाई केली !

तेलंगणाची मोठी कृपा..

दि.२७ जुलै २०२३ ला हा हत्ती भाड्याने मोहरमच्या कार्यक्रमाला देण्यात आला..पण, दैवी शक्ती खरे च अस्तित्वात असते, याची प्रचिती नांदणीकरांना आली. मोहरमचा कार्यक्रम करून परत येताना प्रत्यक्ष दैवी शक्ती म्हणा किंवा देव म्हणा..या हत्तीची बेकायदेशीर वाहतूक तेलंगणाच्या वन विभागाने पकडली आणि ‘पेटा’ ला ‘बासनात गुंडाळलेला’ हा प्रकार चव्हाट्यावर आणण्यास भाग पाडले. दि. ३० जुलै २०२३ ला वन खात्याने हा ट्रक पकडला आणि पुढे सहा दिवसात ‘पेटा’ कामाला लागले !

मठाच्या विरोधातील पुरावे कोर्टात..

पूर्वी, राजू शेट्टीनी हातात आणून दिलेले सगळे पुरावे मठाच्या विरोधात ‘पेटा’ ने कोर्टात वापरले.. दि. ३० जुलै २०२३ ला उद्योगपती अंबानी यांच्या ‘वनतारा’ चे बांधकाम कदाचित सुरू पण केले नसावे..!

कोर्टाकडे घसघशीत पुरावे..

माधुरी ला अल्थरायटीस झालेले आणि दुखापत झालेले सगळे फोटो तसेच व्हिडिओ कोर्टाला मिळाले. दि. २० जून २०२४ ला भारतीय वनरक्षक खात्याने स्पष्ट केले, की गुजरातमधील वनतारा येथे जगातील सर्वात हायटेक हत्तीचा दवाखाना आणि पुनर्वसन केंद्र उघडले असून तेथे तिथ या अल्थरायटीस झालेल्या हत्तीला पाठवा. तसे त्यांनी कोर्टालाही लेखी दिले.

किती दुःखदायक असेल..

दि. 30 जुलै २०२३ ला हत्ती पकडला गेला आणि ३० जुलै २०२५ ला तो हत्ती वनतारा मधे गेला.. तब्बल दोन वर्षे तो हत्ती अल्थरायटीस ने कसा तडफडला असेल, किती दुःखदायक घटना म्हणावी लागेल !

याला जबाबदार कोणाला धरायचे?

या सर्व प्रकाराचा दोष कोणाला द्यायचा? तेलंगणाचे वन अधिकारी? ‘पेटा’ चे वकील? हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ? का हत्ती म्हातारा झाला म्हणून लिहून देणारे मठाधिपती ? का २०२० पर्यंत नको असलेला हत्तीचा अचानक धंदा करणारे लोक ? का हत्तीचा अल्थराईटीस बरा व्हावा, म्हणून जगातील सर्वात हायटेक हत्तीचा दवाखाना वनतारा ची निवड करणारे महाराष्ट्र वन विभाग अधिकारी?

सगळे फक्त रान उठवण्यासाठी..

फक्त उद्योगपती अंबानी यांच्या बद्दल लोकांना वाईट सांगून, विष पेरणी करून जनप्रक्षोभ घडवायचा आणि जैन समाज विरूध्द सरकार असा फेक नॅरेटिव्ह सेट करणारी ही नथद्रष्ट मंडळी !

हत्ती परत आणा सुविधा द्या..

आता माधुरी वनतारा मध्ये मोकळा श्वास घेत आहे तर घेऊ द्या, हत्ती परत आणा पण त्याला सर्व सुविधा देण्याचे वचन द्या. कसलेही राजकारण न करता त्या मुक्या जनावराला मनसोक्त वावर करू द्या आणि मोकळा श्वास घेऊ द्या, एवढी सर्वसामान्य नागरिकाची इच्छा आहे, हे नक्की!

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button