#Lockdown: देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा- केंद्रीय गृहमंत्री
देशात अन्न, औषधे व जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून टाळेबंदीचा कालावधी वाढला असला तरी काळजी करण्याचे कारण नाही, असा निर्वाळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.
शहा यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, सधन कुटुंबांनी आजूबाजूच्या गरीब लोकांना मदत करावी. देशात अन्न, औषधे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून त्याबाबत काळजी करण्याचे कारण नाही.
राज्य सरकारांच्या कामगिरीची प्रशंसा करताना त्यांनी म्हटले की, राज्य सरकारे केंद्राच्या बरोबरीने काम करीत असून नागरिकांनी टाळेबंदीच्या नियमांचे पालन करावे; यासाठी समन्वय साधून पुढील पावले टाकण्याची गरज आहे. लोकांना गरजेच्या वस्तू मिळण्यात अडचणी येता कामा नयेत. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, पोलीस तसेच सर्व सुरक्षा कर्मचारी े करोना विरोधातील लढय़ात मोठी भूमिका पार पाडत आहेत. कठीण परिस्थितीत काम करण्याचे त्यांचे धैर्य हे सर्व भारतीयांना प्रेरित करणारे आहे. सर्वानी मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून डॉक्टर्स व परिचारिका तसेच पोलीस यांना सहकार्य करावे.
शहा यांनी पुढे म्हटले आहे,की जगात करोना साथीने थैमान घातले असताना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील लोकांनी करोनाचा खंबीरपणे मुकाबला केला आहे. सरकारने सगळे निर्णय वेळेत घेतले असून लोकांनीही त्याला साथ दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या विषाणूचा प्रसार देशात होऊ नये यासाठी टाळेबंदी ३ मे पर्यंत वाढवली असून पंतप्रधान मोदी यांचे त्यासाठी आभारच मानले पाहिजेत. भाजप कार्यकर्तेही गरजू लोकांना मदत करीत असून त्यांचे कामही प्रशंसनीय आहे.





