विजांच्या कडकडाटाने नागपूर शहर दणाणले
वादळी पावसाने उडविली दाणादाण, पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी
नागपूर : मेघगर्जना व उरात धडकी भरविणाऱ्या विजांच्या प्रचंड कडकडाटांसह सोमवारी दुपारी धो-धो बरसलेल्या वादळी पावसाने शहरात तासभर अक्षरशः तांडव केले. अचानक आलेल्या धुवांधार पावसामुळे जागोजागी पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी होऊन, वाहनधारकांसह नागरिकांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
शिवाय वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली, बत्तीही गुल झाली. त्यामुळे अग्निशमन विभागासह वाहतूक पोलिसांचीही दमछाक झाली. प्रादेशिक हवामान विभागाचा मंगळवारीही यलो अलर्ट असल्यामुळे वरुणराजा पुन्हा धुमाकूळ घालण्याची दाट शक्यता आहे.
यंदा विदर्भासह सगळीकडे दमदार हजेरी लावणारा मॉन्सून सध्या परतीच्या मार्गावर आहे. रविवारी राजस्थानच्या काही भागांतून निरोप घेतल्यानंतर लवकरच महाराष्ट्र व विदर्भातूनही ‘एक्झिट’ अपेक्षित आहे. मात्र जाताजाता मॉन्सून विदर्भाला चांगलाच दणका देत आहे. सोमवारी नागपूरकरांना याचा प्रत्यय आला. वरुणराजाने हवामान विभागाचा यलो अलर्ट खरा ठरवत दुपारी दोनच्या सुमारास विशेषतः पश्चिम नागपुरात चांगलाच धुमाकूळ घातला. जवळपास एक तास बरसलेल्या धो-धो वादळी पावसाने अर्धेअधिक शहर धुवून निघाले. केवळ वादळच आले नाही. त्यासोबत मेघगर्जना व कानठळ्या बसविणारा विजांचा प्रचंड कडकडाटही झाला.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
यामुळे नागपूरकरांच्या उरात अक्षरशः धडकी भरली. भीतीपोटी अनेक दुचाकी व चारचाकीचालकांना आडोशाचा आश्रय घ्यावा लागला. काळेकुट्ट ढग दाटल्याने भरदुपारी चक्क अंधार पडला होता. त्यामुळे वाहनधारकांना हेडलाईट सुरू ठेवून वाहने चालवावी लागली. वादळी पावसाचा सर्वाधिक प्रभाव पश्चिम व मध्य नागपुरातील उच्चभ्रू व श्रीमंतांच्या सिव्हिल लाइन्स, धंतोली व रामदासपेठसह सीताबर्डी, शंकरनगर, गांधीनगर, बजाजनगर, खामला, प्रतापनगर, देवनगर, गोपालनगर, रविनगर, फुटाळा, अंबाझरी, गणेशपेठ, शांतीनगर व आजूबाजूच्या भागांमध्ये दिसून आला. या ठिकाणी कुठे गुडघाभर, तर कुठे कंबरेपर्यंत पाणी जमा झाल्याचे पाहायला मिळाले. तासाभराच्या पावसाने मनपाच्या दाव्याचीही पोल उघडी केली.
बहुतांश भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्याची पुरेशी सुविधा नसल्यामुळे चौकांमध्ये तलाव साचले होते. त्यातून वाहने काढताना वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागली. काहींना मनःस्तापही सहन करावा लागला. पाऊस थांबल्यानंतर वाहनधारक बाहेर पडल्याने जागोजागी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक झाली.
झाडे कोसळली, बत्तीही गुल
वादळामुळे शहरातील सिव्हिल लाइन्समधील करोडपती गल्ली, प्रियदर्शनीनगर येथील एनआयटी गार्डनसह अनेक भागांमध्ये झाडे व फांद्या वर्दळीच्या रस्त्यांवर पडल्या. त्यामुळे रहदारीत अडथळा निर्माण झाला. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन झाडे व फांद्या हटविल्या. याशिवाय पावसामुळे काही भागातील बत्तीही गुल झाली. परिणामतः स्थानिक नागरिकांना बराच वेळ विजेविना राहावे लागले.
प्रेस क्लबमध्ये साचले पाणी
महाराजबाग चौक, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या समोर असलेल्या प्रेस क्लब परिसरात पावसाचे पाणी साचले होते. परिसर जलमय झाल्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना चांगलाच मनःस्ताप सहन करावा लागला. मल व सांडपाण्याच्या वाहिन्या तुंबल्याने त्यातून पाणी बाहेर येत होते. घाण पाण्यातून ये-जा करणाऱ्यांची पंचाईत झाली होती.
बजाजनगरात कंबरेपर्यंत पाणी
मुसळधार पावसामुळे बजाजनगर ते व्हीएनआयटी रस्त्यावर कंबरेपर्यंत पाणी तुंबले होते. येथे अक्षरशः पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे या भागातून ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनधारकांची पंचाईत झाली. काहींच्या दुचाकीमध्ये पाणी गेल्याने बंद पडल्या. अनेक जण गाड्या ढकलत नेत असल्याचे दृश्य या रस्त्यावर पाहायला मिळाले.
अपार्टमेंट्समध्येही पाणी तुंबले
धुवाधार पावसाचा फटका सोसायट्या व अपार्टमेंट्सनाही बसला. अनेक ठिकाणच्या अपार्टमेंटसमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी तुंबल्याने तेथील नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागला. वादळाच्या कचाट्यातून झोपडपट्ट्याही सुटल्या नाहीत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने गरिबांचे नुकसान झाले.
आजही वादळाची शक्यता
प्रादेशिक हवामान विभागाचा आणखी एक-दोन दिवस यलो अलर्ट असल्यामुळे मंगळवारीदेखील नागपूरसह संपूर्ण विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानंतर मात्र हळूहळू पावसाचा जोर कमी होणार आहे. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत २७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भातील ब्रह्मपुरी (३५ मिमी), अमरावती (२६ मिमी) व गोंदिया (११ मिमी) येथेही पाऊस आहे.




