सावधान! कोकण, घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Weather | महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आज कोकण आणि घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, उपनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटपरिसर, पुणे, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह (40-60 किमी/तास) आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासूनच राज्याच्या विविध भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहराला पावसाचा जोरदार तडाखा
मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं असून २५ ते २७ मे दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण आणि मुंबई दाखल होईल तर दुसऱ्या आठवड्यात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल असं सांगितलं जात आहे.