भारतीय नृत्य, देशभक्ती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’! ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचं खास स्वागत

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै ते ९ जुलै पर्यंत पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी ते अर्जेंटिनाहून ब्राझीलला पोहोचले. पाच देशांच्या दौऱ्यातील ब्राझील हा चौथा देश आहे. ते ब्राझीलच्या प्रमुख शहर रिओ डी जानेरो येथे होणाऱ्या १७ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. येथे पोहोचल्यावर भारतीय समुदायाकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले.
ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचं स्वागत पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणं करून करण्यात आले. तेथील भारतीय लोकांनी हातात तिरंगा घेऊन मोदींचं स्वागत केलं. या स्वागतात सर्वात खास ठरले ते ‘ऑपरेशन सिंदूर’ चे सादरीकरण. हे सादरीकरण भारताकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या निर्णायक लष्करी मोहिमेवर आधारित होते. नृत्य आणि चित्रांच्या माध्यमातून हे दृश्य उभं करण्यात आले होते.
प्रवासी भारतीयांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत पेंटिंग्स आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ आधारित नृत्य सादरीकरणाच्या माध्यमातून केलं. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात भाग घेतलेल्या भारतीय महिला नृत्यांगनांशी संवाद साधला. नृत्यांगनांपैकी एका कलाकाराने सांगितलं, “पंतप्रधान मोदी आमच्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्यांचं इथे येणं ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी आमचं सादरीकरण फार संयमाने पाहिलं, आम्हाला भेटले आणि खूप कौतुक केलं. आम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’ ही संकल्पना निवडली कारण आमच्या शूर सैनिकांना मानवंदना द्यायची होती आणि भारत मातेचा गौरव करायचा होता.”
पंतप्रधान मोदी ब्राझीलच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून, ६ आणि ७ जुलै रोजी ते रिओ डी जेनेरियो येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते अधिकृत राजकीय भेटीसाठी ब्रासीलिया येथे जातील. सुमारे सहा दशकांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा हा देशातील पहिला द्विपक्षीय दौरा आहे.
या राजकीय दौर्यात पंतप्रधान मोदी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुइझ इनासियो लूला दा सिल्वा यांच्याशी भेट घेणार असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, शेती, आरोग्य आणि जनतेतील परस्पर संपर्क या विषयांवर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांतील धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरेल.