पुणे आणि घाटमाथ्याला दोन दिवस रेड अलर्ट, तब्बल 200 मिमी पावसाचा अंदाज, नाशिक, रत्नागिरीसह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update : संपूर्ण देशात पावसाची तीव्रता वाढली असून, काश्मीरपासून दिल्ली, हरियाणा, उत्तर भारत, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रात 5 ते 10 जुलैदरम्यान बहुतांश भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ताशी 40 ते 60 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे देशातील पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, दक्षिण कर्नाटक, जम्मू, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, ओडिशा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, केरळ आणि कर्नाटक या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात क्षीण झालेला मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याला रविवारी आणि सोमवारी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुमारे 200 मिमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील 9 जिल्ह्यांसाठी मुसळधारेचा ऑरेंज अलर्ट, तर 19 जिल्ह्यांसाठी मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हेही वाचा – भारतीय नृत्य, देशभक्ती आणि ‘ऑपरेशन सिंदूर’! ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचं खास स्वागत
आज रविवारी (दि. 6) रोजी, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकचा घाटमाथा, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 4 हजार 656 इतका पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पूर परिस्थिती वाढली असून आजूबाजूच्या परिसरात पुन्हा पुराचे पाणी शिरल्याचे दिसून येत आहे.
गोसेखुर्द धरणाचे आता 15 गेट अर्धा मिटरनं उघडण्यात आले असून त्यातून 62 हजार 139 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल धरणाचे 27 गेट उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग करण्यात आला होता. आज 12 गेट बंद करून सकाळपासून 15 गेटमधून हा विसर्ग केला जात आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस कमी झाल्यानं पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.