भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
प्रशासन सतर्क राहून खबरदारीच्या उपाययोजना करत आहेत

नागपूर : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी अधिक दक्ष राहावे. विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही क्षणी आवश्यकता भासेल तिथे उपस्थित राहण्याच्या दृष्टीने मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून प्रशासकीय पातळीवर आवश्यक सर्व उपाययोजना केल्या आहेत.
सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
नियोजन भवन येथे शनिवारी त्यांच्या अध्यक्षतेखाली खबरदारीच्या उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक झाली. पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, नासुप्रचे सभापती संजय मिणा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे संचालक डॉ. हरीओम गांधी यांच्यासह सर्व आस्थापनांचे सुरक्षा अधिकारी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा – एकनाथ शिंदेंचं वक्तव्य; “कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं ते कापावं लागतं, पाकिस्तानला….”
लोककल्याणासाठी, शांततेसाठी, समाजातील सौहार्दपण टिकवून सुरक्षेसाठी काळजी घेत स्वत:ला तत्पर ठेवणे जागृत नागरिकांचे आद्यकर्तव्य आहे. यासाठी नागरिकांच्या सोबतीला जिल्हा प्रशासनासह, पोलिस यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा आहे. होमगार्ड यंत्रणेवर सुरक्षिततेसह आवश्यकता भासेल त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधेपासून सर्वत्र तत्पर राहण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. जागृत समाज व्यवस्थेत अधिक संयम हा प्रत्ययास येतो, असे त्यांनी सांगितले.
शासनाच्या संकेतस्थळावर व्हिडिओ उपलब्ध
नागरिकांना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून वेळोवेळी विविध प्रकारची माहिती प्रसारित केली जाते. याचे व्हिडिओ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने शासनाचे हे अधिकृत व्हिडीओज, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, काय करू नये ही सर्व माहिती समाज माध्यमांवर शेअर केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्याच्या सुविधा तत्पर ठेवा
या तणावाच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणांनी आपल्या जवळ असलेल्या सर्व सुविधांची प्रत्यक्ष खातरजमा करून तत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषत: आपातकालीन परिस्थितीत शासनाच्या निकषाप्रमाणे हॉस्पिटलमधील बेड/कॉटची व्यवस्था, स्टेचरची सुस्थिती, सुरक्षा यंत्रणा याबाबी तत्पर ठेवण्यास सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आवश्यकता भासेल तेवढे रक्त उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरकरांमध्ये अधिक सकारात्मकता व सतर्कता आहे. यादृष्टीने काही ठिकाणी रक्तदान शिबिरे घेण्याचे निर्देश डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
सर्व यंत्रणा सतर्क
नागरिकांच्या आवश्यक सेवा सुविधा सुस्थितीत राहाव्या यादृष्टीने महानगर पालिका, नगरपरिषदा,नगरपंचायती, पंचायत समित्यांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. पाणी पुरवठ्यापासून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे, आपल्या अखत्यारित असलेली सार्वजनिक रुग्णालय तत्पर ठेवणे, जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा साखळी सुरळीत राहील याची खबरदारी घेणे, कुठेही अराजकता होऊ नये यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखाने आपसी सहकार्याच्या भावनेतून अधिक जबाबदार प्रशासनाचा प्रत्यय दिला पाहिजे. यादृष्टीने डॉ. इटनकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना केल्या.