‘इंडिया आघाडी’ तील १६ पक्षांचे ‘सवते सुभे’ !

पाकिस्तानच्या विरोधात मोदी सरकारने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ची कारवाई कशी खोटी होती, कशी अपयशी झाली, हे पटवून देण्यासाठी आणि जनतेमधून उठाव करण्यासाठी सोळा विरोधी पक्षांच्या ‘इंडिया आघाडी’ ची बैठक आयोजित केली खरी, पण सोळा पक्षांची तोंडे सोळा दिशांना झाल्याने आणि प्रत्येकाने ‘सवते सुभे’ मांडल्याने या आघाडीमध्ये महाबिघाडी झाल्याचे चित्र विरोधी कार्यकर्त्यांमध्ये गेले असून काही डागडुजी करता येते का, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
शरद पवारांचे घुमजाव..
या ‘इंडिया आघाडी’ तील एक घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीने काढता पाय घेतला असून ‘त्या’ निवेदनावर शरद पवारांची सहीच नाही, असे सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेली ही इंडिया आघाडी एकाच वर्षात तुटताना दिसत आहे. ‘आप’ चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार या आघाडीपासून दूर जात आहेत, तर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी मात्र जवळ येत असल्याचे चित्र आहे.
विशेष अधिवेशनाची मागणी..
‘ऑपरेशन सिंदूर’ च्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली या आघाडीची नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीला १६ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. परंतु शरद पवार आणि केजरीवाल यांच्या पक्षातील कोणीही उपस्थित नव्हते. तर दोन हात लांब राहणाऱ्याममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी हजेरी लावली.
नरेंद्र मोदींच्या धोरणाचा विरोध..
मोदी सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याच्या इराद्याने आयोजित ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीत १६ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस, टीएमसी, डीएमके, सपा, उद्धव ठाकरे गट, आरजेडी, नॅशनल कॉन्फरन्स, जेएमएम, सीपीएम, सीपीआय, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, व्हीएसपी, केरळ काँग्रेस, एमडीएमके आणि सीपीआय या पक्षांच्या नेत्यांनी भाग घेतला. यावेळी सविस्तर चर्चा होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि अमेरिकेने घोषित केलेल्या ‘युद्धविराम’ या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची विनंती केली.
हेही वाचा – ‘RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी
केजरीवाल, शरद पवार आघाडीपासून दूर..
संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीला दोन महत्त्वाचे विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांनी विरोध केला आहे. शरद पवार यांच्या पक्षाने पत्रावर स्वाक्षरी केली नाही. या आघाडील आकार देणाऱ्या नेत्यांमध्ये शरद पवार यांचे नाव समाविष्ट होते. त्यानंतरही शरद पवार बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी पूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली असून विशेष अधिवेशनाची गरज नाही असे म्हटले आहे. भारताची युद्धनीती, राजनीति आणि कूटनीती सभागृहात चर्चिली जाऊन जगापुढे मांडायची का, असा त्यांचा सवाल आहे.
उबाठा गटाची भूमिका काय?
शरद पवार यांच्या अनुपस्थिती बाबत विचारता उबाठा गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, लोकसभेतील राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आहेत, त्या परदेशात गेलेल्या प्रतिनिधी मंडळाचा भाग असल्याने त्या देशात नाहीत. शरद पवारही आमच्यासोबत आहेत.
शरद पवारांच्या मनात काय?
संजय राऊत यांनी निश्चितच शरद पवार हे त्यांच्यासोबत आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु शरद पवार यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी आधीच फेटाळून लावली आहे. शरद पवार यांनी स्पष्ट म्हटलं होतं की, हा एक संवेदनशील आणि गंभीर मुद्दा आहे. संसदेत इतक्या गंभीर विषयावर चर्चा करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रीय हितासाठी माहिती गुप्त ठेवणे आवश्यक आहे, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याऐवजी आपण सर्वांनी सर्वपक्षीय बैठक घेतली, तर बरे होईल.
मोदींची ताकद वाढतच आहे..
गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून शरद पवार यांनी पाहिले आहे की पंतप्रधान मोदी राजकीयदृष्ट्या कमकुवत होऊ शकतात, परंतु सध्या ‘एनडीए’ ला सत्तेवरून काढून टाकणे सोपे नाही. मोदींची ताकद वाढताना दिसत आहे. अलिकडच्या काळात शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात अनेक बैठका झाल्या आहेत. तेव्हापासून काका-पुतणे एकत्र येण्याबाबत अटकळ बांधली जात आहे. जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर सुप्रिया सुळे यांचा केंद्रात मंत्री होण्याचा मार्गही मोकळा होऊ शकतो. अशा परिस्थितीत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि युद्धबंदीच्या मुद्द्यावर शरद पवार मोदी सरकारसोबत उभे असल्याचे दिसून येत आहे.
केजरीवालांनी संबंध तोडले..
‘आम आदमी पक्षा’ ने ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीच्या मुद्द्यावर मोदी सरकारविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे. संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही ते करत आहेत, जेव्हा इंडिया आघाडीने या मुद्द्यावर बैठक बोलावली होती, तेव्हा आम आदमी पक्ष उपस्थित राहिला नाही. ‘आप’ ने लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीशी संबंध तोडले आहेत. त्यामुळे दिल्लीत असूनही केजरीवाल बैठकीला उपस्थित नव्हते. दिल्ली निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी अरविंद केजरीवाल काँग्रेसला जबाबदार धरत आहेत. काही राज्यांमध्ये त्यांची लढत काँग्रेस बरोबर असल्यामुळे या आघाडीत राहणे केजरीवाल यांना तोट्याचे जाऊ शकते !
ममता आघाडीच्या जवळ..
लोकसभा निवडणुकीत जेव्हा इंडिया आघाडीची पायाभरणी होत होती. तेव्हा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी स्वतःला दूर केले होते. सार्वत्रिक निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भाजप तसेच काँग्रेस तसेच डावे पक्ष यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी इंडिया आघाडीच्या बैठकांपासून अंतर ठेवले. संसदेपासून रस्त्यांपर्यंत, एक वेगळीच तृणमूल काँग्रेस दिसली, परंतु ऑपरेशन सिंदूर आणि युद्धबंदीनंतर, ममता बॅनर्जींच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे.
मोदी यांच्या झंजावाताची भीती
भाजपा प्रणित आघाडीच्या विरोधात उभे राहण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली खरी, पण विकास कामे आणि भावनिक घटना उभ्या करून नरेंद्र मोदी यांची ताकद दिवसेंदिवस वाढतच असल्याचे सर्व विरोधकांच्या लक्षात आले आहे. त्यात अजून नरेंद्र मोदी यांच्या हातात पुढील चार वर्षे आहेत. विरोधासाठी विरोध करून आपल्या पक्षाचे नुकसान करून घेण्याऐवजी मोदी यांच्याशी तडजोड करून बेरजेचे राजकारण खेळावे, असे विरोधकांना तर वाटत नाही ना? हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे.