मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५: मान्यवरांचा गौरव सोहळा थाटात!
मुंबई: विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती

मुंबई । प्रतिनिधी : ‘माई मीडिया २४’ आणि मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने, प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर यांच्या सहकार्याने आयोजित ‘मीडिया एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५’ चा भव्य पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा गौरव करण्यात आला.
थँलसेमिया मुक्त महाराष्ट्र हा सोहळ्याचा युएसपी
या वर्षी ‘थँलसेमिया मुक्त महाराष्ट्र’ अभियान हा कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. या अनुषंगाने साथ संस्थेच्या सुजाता रायकर यांनी सरकारी सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत लढ्याचा विस्तार करण्याचा निर्धार बोलून दाखविला.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा विशेष सन्मान
मा. ना. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना विधान परिषद शतक महोत्सवातील योगदान व साहित्य क्षेत्रातील ऐतिहासिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. ‘माई मीडिया २४’ च्या सातत्यपूर्ण कार्याचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले.
अभिनेते अशोक सराफ, विजय पाटकर यांचा गौरव
पद्मश्री व महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि अभिनेते विजय पाटकर यांना त्यांच्या बहुमोल योगदानाबद्दल ‘विशेष सत्कार’ देण्यात आला. माध्यम क्षेत्रातून मिळालेला हा सन्मान त्यांनी अत्यंत मोलाचा मानला.
निखळ संवादाचे महत्त्व : नितीन केळकर
जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार नितीन केळकर यांनी पारंपरिक माध्यमांच्या मर्यादांचा उल्लेख करत नवमाध्यमांच्या गरजेवर भर दिला. संवादक्षम व संवेदनशील माध्यमधर्मींची भूमिका त्यांनी अधोरेखित केली.
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पत्रकारिता, डिजिटल मीडिया अशा विविध क्षेत्रातील खालील मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला:
अनन्या गोयंका – शिक्षण व सामाजिक कार्य (उडान ट्रस्ट)
सयाजी शिंदे – सह्याद्री देवराईद्वारे निसर्ग संवर्धन
डॉ. प्रदीप ढवळ – साहित्यक्षेत्र
ॲड. संगीता चव्हाण – स्त्री सक्षमीकरण
संतोष पवार – लोककला संवर्धन
वैदेही परशुरामी – अभिनय क्षेत्र
किशोर आपटे, मोहन बने, श्रीकांत बोजेवार, संजीव भागवत – वरिष्ठ पत्रकार
विशाल पाटील, प्रेरणा जंगम, श्वेता वडके – संपादक व वृत्तनिवेदक
विशेष सत्कार
दिपक करंजीकर, जयवंत वाडकर, श्रुती राहुल, अक्षय कुडकेलवार, श्रेयस सावंत, आनंद मुरुगकर यांचा कला, पत्रकारिता व डिजिटल क्षेत्रातील कामगिरीसाठी विशेष सत्कार करण्यात आला.
आयोजक शीतल करदेकर यांचा अभिनव उपक्रम
सोहळ्याचे समन्वयक आणि ‘माई मीडिया २४’ चे संस्थापक अध्यक्ष प्रो. शीतल हरीष करदेकर यांनी हा पुरस्कार सोहळा वेगळा ठरावा या हेतूने आयोजित केल्याचे सांगितले. समाजासाठी कार्य करणाऱ्यांना व्यासपीठ देणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमामध्ये लोककलाविष्कार, कला, संवाद, आणि सामाजिक जाणिवेचा सुरेख संगम पाहायला मिळाला. मान्यवरांच्या मनोगतांमधून पुढील पिढीला कार्याची प्रेरणा मिळेल, असं सर्वच उपस्थितांचं मत होतं.