कसं काय पाटील, बरं हाय का ?

राष्ट्रवादी काँग्रेसची छकले झाल्यानंतर शरद पवार गटाची धुरा यशस्वीपणे आणि खंबीरपणे वाहणारे जयंत पाटील..त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष..पण, गेल्या काही दिवसात त्यांच्याबद्दल जे ऐकायला मिळते ते अनाकलनीय आणि अतर्क्य म्हणावे लागेल ! जयंत रावांचा एक पाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर दुसरा पाय भारतीय जनता पार्टीच्या उंबरठ्याच्या आत आहे, हे जवळजवळ प्रत्येकाला समजून चुकले आहे..अगदी शरद पवारांना सुद्धा !
वास्तविक, राजकारणात एखाद्यावर संशय घेतला गेला, तर तो नेता थोडी सावधानतेची भूमिका बाळगतो..पण, जयंत पाटील मात्र बिनधास्तपणे वावरत असतात आणि टोलेबाजी ही करत असतात.
रात्रीस खेळ चाले..
तसे पाहिले तर भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील ‘सर्वेसर्वा’ देवेंद्र फडणवीस, जयंतरावांच्या पक्षाच्या दुसऱ्या गटाचे नेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व ज्येष्ठ नेते जयंतरावांच्या अगदी जवळचे मानले जातात. आणि हे सर्वजण राजकारणात एवढे ज्येष्ठ आहेत की प्रत्येकाच्या मनात काय, प्रत्येकाची भूमिका काय? हे जग जाहीरच म्हणावे लागेल.
ताकाला जाऊन भांडे का लपवायचे?
मग, असे असताना जयंतराव हे नेहमी संदिग्ध भूमिकेत का वावरतात? हा खरा प्रश्न आहे. वास्तविक, फार पूर्वी म्हणजे अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाहेर पडण्यापूर्वी जयंतरावांनी भाजपाशी संधान बांधले होते आणि ते कोणत्याही क्षणी भाजपामध्ये प्रवेश करतील अशी आवई उठवली गेली होती, हा इतिहास अगदी ताजा आहे. पण, कदाचित ते लक्षात आल्यामुळेच असावे, शरद पवार यांनी जयंतरावांच्याकडे थेट प्रदेशाध्यक्षपद सोपवून त्यांचा भाजपाचा मार्ग रोखला असावा !
हेही वाचा – अमेरिकेची संशोधनासाठी पुण्याला पसंती! विविध संस्थांसोबत भागीदारीचे पाऊल
परंतु, या घटनेनंतर आता बरेच दिवस झालेत..राजकारणाच्या प्रवाहाचे बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. महाराष्ट्रामध्ये आता पाच वर्षे भाजपा हालत नाही, केंद्रामध्ये भाजपा पाच वर्षे अशीच राहणार, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच बहुतेकांनी सुरक्षित क्षेत्र म्हणून भाजपा किंवा त्यांच्या सहयोगी पक्षांमध्ये प्रवेश करून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा मार्ग अवलंबला असावा, म्हणूनच जयंतरावांचे नियोजन कोणाच्या लक्षात येत नाही.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची भेट
हा सर्व गोंधळ आणि या प्रकारच्या राजकीय चर्चा सुरू असतानाच जयंतरावांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा भेट घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि पुन्हा त्यांच्या भाजपामधील प्रवेशाच्या चर्चेला ऊत आला. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत तासभर ही भेट चालल्याची माहिती समोर आल्याने जयंतराव यांच्या राजकीय भूमिकेबाबत उलटसुलट चर्चांनाही सुरुवात झाली. अखेर स्वतः जयंतरावांनी ही भेट झाल्याचे मान्य करतानाच सांगली जिल्ह्यातील कामांची निवेदने देण्यासाठी भेट घेतल्याचा खुलासा करत राजकीय चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात त्यांच्या या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, कारण, पक्ष सोडणे किंवा नवीन पक्ष जोडणे या कालखंडात कोणीही एक दुसऱ्याला काही कामानिमित्त भेटलो असेच सांगत असतो.
जयंतरावांची नवीन राजकीय भूमिका
जयंतरावांना निवेदनच द्यायचे होते, तर मग ते दिवसाही देऊ शकले असते. त्यासाठी रात्रीची वेळ कशाला ? हा मुद्दा अनुत्तरीतच राहतो. जयंतराव हे नवी राजकीय भूमिका घेणार असल्याच्या चर्चा अधूनमधून नवे हल्ली रोजच सुरू असतात. विशेषतः, शरद पवार गटात प्रदेशाध्यक्षपदावरून सुरू असलेली धुसफूस, रोहित पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून याबाबत घेतली जाणारी भूमिका यामुळे जयंतराव वेगळा विचार करणार असल्याच्या वावड्या उडत असतात म्हणून जयंतरावांनी बावनकुळे यांची घेतलेली भेट चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
जयंतरावांची सारवासारव
या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात, हे खेदजनक आहे, असे म्हणत या भेटीबाबत जयंतरावांनी सारवासारव केली आहे खरी, पण कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्या पक्षांतराविषयी नक्कीच संभ्रम आहे, हे निश्चित !
तसे पाहिले तर चंद्रशेखर बावनकुळे हा अगदी सडेतोड नेता. स्वतःच्या अंगलट येत असेल तर स्पष्ट बोलून मोकळा होणारा.. जयंत पाटील यांची भेट झाली, बावनकुळेंनी स्पष्टच सांगून टाकले आहे. ते एवढेच म्हणाले, की जयंत पाटील यांनी माझी अधिकृतपणे वेळ घेऊन शासकीय बंगल्यावर भेट घेतली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटीलदेखील सोबत होते. मात्र, यावेळी कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.
सांगलीतील प्रश्नांबाबत होती म्हणे भेट !
सांगली परिसरातील महसूल खात्याशी संबंधित १४ प्रश्न आणि त्या संदर्भातील समस्या घेऊन जयंत पाटील भेटले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक होईल. यासंदर्भात बैठक घेण्याचे मान्य केले, राजकीय विषयावर आम्ही बोललो नाही, असे सांगून बावनकुळे मोकळे झाले.
शरद पवारांचा ‘वजीर’ भाजपच्या गळाला ?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार, हे आता सिद्ध झाले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांपैकी उद्धव ठाकरेंचा गट आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांपैकी शरद पवार यांचा गट अडचणीत सापडला असून त्यांना घरघर लागली आहे.. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे! लोकसभेच्या वेळी नऊ खासदार निवडून आल्यामुळे शरद पवार गटाला चांगलीच ताकद मिळाली होती. पण, विधानसभेच्या वेळी त्यांची दाणादाण उडाली आणि त्यातच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आल्यामुळे जयंतराव हे पक्ष सोडून जाणार, हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. थोडक्यात, शरद पवार यांचा ‘वजीर’ च भाजपाच्या गळाला लागणार, अशी चर्चा पुढे येऊ लागली. जयंतराव देखील गेल्या काही महिन्यापासून मौन बाळगून आहेत. राज्यात अनेक घटना घडत असताना सुद्धा ते कोणत्याही घटनेवर प्रतिक्रिया देत नाहीत.
अशातच मध्यंतरी सांगलीतील एका कार्यक्रमात त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती आणि त्यांच्याबरोबर दिलखुलास चर्चाही झाल्याचे सर्वांनी पाहिले. जयंतराव यांनी भाजपची कास धरली, तर शरद पवार गटासाठी तो एक मोठा धक्का असून त्या भूकंपातून सावरण्यासाठी शरद पवार गटाला बरेच दिवस लागतील, हे आता लवकरच समजेल. दोन पक्षांच्या डगरीवर हात ठेवून बसलेले जयंतराव कोणता निर्णय घेतात, याकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे, हे नक्की !