आपला इतिहास नाकारणे, हे तर आत्मघाती पाऊल !

कोणत्याही देशासाठी नाही तर व्यक्तीसाठी स्वतःचा इतिहासा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि इतिहास नाकारणे तसेच आपल्या राष्ट्राच्या संस्थापकाला नाकारणे, हे आत्मघाती ठरते हे देखील इतिहासात नमूद झालेले आहे.
इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा..
आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात डोकावले तर आपल्या राज्याची जडणघडण आपल्या राज्यात गाजलेली व्यक्तिमत्त्वे, स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचा सहभाग, हे प्रत्येक गावाचं माहीत असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हे राज्य छत्रपती शिवरायांचे आहे, असे आपण जेव्हा म्हणतो त्यावेळी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपतींनी केलेल्या अतुलनीय कामगिरीचा अभ्यासही करणे महत्त्वाचे आहे.
आता वळूया बांगलादेश कडे !
संपूर्ण जगात अस्वस्थ असलेला भाग म्हणजे दक्षिण आशिया! इथं भारत – पाकिस्तान मध्ये संघर्ष सुरू आहे. चीन खत पाणी घालत आहे, तिकडे श्रीलंका आणि म्यानमार या ठिकाणी हिंसक घटना घडत आहेत आणि मुख्य म्हणजे बांगलादेशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंसाचार तसेच उलथापालथ सुरू आहे. बांगलादेश ला किती कठीण प्रसंगातून जावे लागले याचाच विसर येथील राजकारण्यांना पडला असून त्या देशाची स्थापना करणाऱ्याचा विसर आणि तो संपूर्ण इतिहास बासनात गुंडाळला जात आहे.
अत्यंत कोती वृत्ती, स्वार्थी कुठले ?
तर सांगण्याचा मुख्य मुद्दा म्हणजे बांगलादेशाचे सध्याचे नेतृत्व हेच करीत आहेत. या बांगलादेश या स्वतंत्र निर्मितीसाठी आणि पाकिस्तानच्या जोखडातून सुटण्यासाठी बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांनी अर्पण केलेले संपूर्ण जीवन हे सरकार विसरून गेले आहे. शेख मुजबूर रहमान यांचे पुतळे पाडल्यानंतर आता त्यांचा फोटो असलेल्या चलनी नोटा रद्द करण्यात आल्या आहेत आणि राष्ट्रपिता म्हणून त्यांना असलेला दर्जाही रद्द केलेला आहे.
तर विध्वंस अटळ, दुसरे काय?
बांगलादेशच्या स्वातंत्र्यसैनिकांना मुक्ती युद्धाचे सहयोगी म्हटले जात होते. बांगलादेशात पाकिस्तानच नाही तर इतरही काही देश घाणेरडे राजकारण करीत आहेत. तेथे तर आता दहशतवादी वृत्तीने ही घुसखोरी केली आहे. ग्रामीण बँकेची संकल्पना मांडल्यानंतर अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळविणारे मोहम्मद युनूस सध्या बांगलादेशचे प्रमुख आहेत. त्यांनी शेख मुजीबूर रहमान आणि त्यांच्या कुटुंबियांविरूद्ध शत्रुत्वाचा एक प्रकार अवलंबिला आहे, एव्हढेच नाही तर त्यांची भारतविरोधी वृत्तीही समोर आली आहे.
हेही वाचा – ते तर 25 जागा जिंकू शकत नव्हते…त्यांनी राज्याच्या निवडणूक हायजॅक केली, राहुल गांधीनंतर राऊत सुद्धा आक्रमक
परकीय शक्तीच्या हातातील बाहुले..
सध्याचे संपूर्ण राजकारण पाहता मोहम्मद युनूस परकीय शक्तीच्या हातातील बाहुले बनले आहेत. युनूस एकीकडे पाकिस्तानशी मैत्री वाढवित आहेत, तर दुसरीकडे चीनच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.ज्या पाकिस्तानच्या सैन्याने बांगलादेशी नागरिकांवर अमानुष अत्याचार केले होते, ज्यांच्या लष्कराने तेथील महिलावर बलात्कार केले होते, त्यांच्यासोबत युनूस आणि त्यांचे सरकार मैत्री करीत आहेत. एकेकाळी जनरल टिक्काखान म्हणाले होते की, मी बांगलादेशींचा वंशच संपवून टाकेन. पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र बांगलादेश बनविण्यात आणि इस्लामाबादच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यात भारताचे ऐतिहासिक आणि अमूल्य योगदान असून तेथील सध्याचे नेतृत्व ते विसरले आहे. ही पराकोटीची कृतघ्नता आहे, असेच म्हणावे लागेल.
युनूस यांचे थेट चीनलाच निमंत्रण..
मोहम्मद युनूस यांनी चीनला बांगलादेश विकसित करण्याचे निमंत्रणही दिले आणि म्हटले की, ईशान्य भारतावर कब्जा करून चीन बांगलादेशच्या चितगाव बंदरात प्रवेश मिळवू शकतो. भारताने आश्रय दिलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेश सरकार मृत्यूदंड देऊ इच्छिते. किंबहुना त्याची तयारी देखील झाली आहे. मोहम्मद युनूस सत्तेला चिकटून आहेत आणि त्यांना बांगलादेशात निवडणुका घ्यायच्या नाहीत. अशा परिस्थितीत त्यांचा सामना बांगलादेश आर्मी किंवा बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या प्रमुख खलिदा झिया यांच्याशी होईल, याची त्यांना भीती वाटत आहे.
युनूस यांना प्रतिकूल वातावरण..
बांगला देश ज्या मार्गावर वाटचाल करीत आहे, त्याचे दीर्घकालीन परिणाम होतील आणि ते त्यांच्या विरोधात जातील. कट्टरपंथीयांच्या वाढत्या प्रभावामुळे, लवकरच ते त्यांची लोकशाही गमावू शकते. भारताशी संघर्षाचा मार्ग युनूस यांच्यासाठी खूप महागात पडू शकतो.
भारताने धाकटा भाऊ मानले..
बांगलादेशात कोणतेही सरकार सत्तेवर आले तरी, त्यांना हे समजून घ्यावे लागेल की, भारतासारख्या मोठ्या शेजारी देशाशी सहकार्य करणे, व्यापार वाढवून फायदा करून घेणे आणि चांगले संबंध ठेवणे, हे त्यांच्या हिताचे आहे. बांगलादेशला भारताने नेहमीच आपला एक लहान भाऊ समजून सर्वांग मदत केली. या मदतीची परतफेड न भूतो न भविष्यती स्वरूपाची आहे. हे सांगण्याची तशी गरजच नाही. पण बांगलादेशच्या सत्ताधाऱ्यांचे वर्तमान वर्तन पाहता हा उल्लेख आपसूकच मनात येतो हे तेवढेच खरे आहे.
भारताबरोबरचा पंगा लढणार..
बांगलादेशातील उठावानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना भारताने आश्रय दिला, याचा मनस्वी राग तेथील सत्ताधाऱ्यांना आहे. भारतावरील हा राग तेथील हिंदूंची कत्तल करून आणि महिलांवर बलात्कार करून तथाकथित दहशतवादी व्यक्त करीत आहेत. इतिहास विसरणारे हे बांगलादेशी निवडणुका जवळ आल्या असल्याने खाडकन डोळे उघडून जागे होतील आणि शेवटी लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करतील. सध्या तरी त्यांना भारताशिवाय तरणोपाय नाही, याचा विचार मात्र तेथील ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिकांनी करायला हवा, याशिवाय दुसरे उत्तर दिसत नाही !