नमस्कार फ्रॉम स्पेस…! शुभांशू शुक्ला अंतराळात दाखल, भारताची अभिमानास्पद झेप

न्यूयॉर्क : भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर गुरुवारी दुपारी ४:०१ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुखरूप दाखल झाले आहेत. हे सर्व अंतराळवीर सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर आयएसएसमध्ये पोहोचले आहेत. दरम्यान, ऍक्सिओम स्पेसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये शुभांशू यांनी त्यांच्या अंतराळ प्रवासाच्या रोमांचक अनुभवाचे वर्णन केले.
व्हीडीओमध्ये शुभांशू म्हणतात, नमस्कार फ्रॉम स्पेस. मला खूप अभिमान वाटतोय. माझ्या खांद्यावरचा तिरंगा सांगत होता की, सर्व देशवासी माझ्यासोबत आहेत. भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणासाठी हे एक मोठे पाऊल आहे. अंतराळ प्रवास हा माझ्यासाठी स्वप्नासारखा अनुभव आहे. प्रक्षेपणानंतर जेव्हा मी पृथ्वी पाहिली, तेव्हा असे वाटले की, जणू एखाद्या चित्रकाराने निळे आणि हिरवे रंग मिसळून कॅनव्हास बनवला आहे.
ड्रॅगन अंतराळयान प्रक्षेपणानंतर १० मिनिटांनी रॉकेटपासून वेगळे झाले, तेव्हा मला खिडकीतून सूर्याची चमक आणि तारे दिसले. माझ्यासाठी ते अविश्वसनीय होते. हा माझा प्रवास नाही, तर भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात आहे. माझ्याद्वारे तुम्हीही या प्रवासाचा पुरेपूर आनंद घ्या.
हे एक नवीन आणि आव्हान वातावरण आहे. मी माझ्या सहकारी अंतराळवीरांसोबत हा अनुभव खूप एन्जॉय करत आहे. आम्ही तुम्हाला जॉय आणि ग्रेस दाखवले. हे एक हंस असून एक महत्त्वाचे प्रतीक आहे. ते खूप गोंडस दिसते, आपल्या भारतीय संस्कृतीत हंस बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. मला वाटते की पोलंड, हंगेरी आणि भारतातही त्याचे प्रतीकात्मक महत्त्व आहे. हा योगायोग वाटेल, पण तसे नाही. याचा अर्थ यापेक्षा खूप जास्त आहे, असेही शुभांशू म्हणाले.
दरम्यान, अॅक्सिओम मिशन-४ अंतर्गत चार अंतराळवीर बुधवारी दुपारी १२ वाजता आयएसएससाठी रवाना झाले. त्यांनी स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण केले होते. तांत्रिक बिघाड आणि हवामानाच्या समस्यांमुळे हे मिशन ६ वेळा पुढे ढकलण्यात आले होते.