धोत्रे काकांचे नाट्यप्रेम आणि शासनाचा सन्मान
तळेगाव : तळेगाव दाभाडे येथे २४ तारखेला पवार हॉस्पिटलच्या समोर शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा समारोप समारंभ मोठ्या धडाक्यात झाला. या सोहळ्यात ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाने मनोरंजनाची रंगत आणली. हे नाट्यसंमेलन मावळ तालुक्याचा गौरव असून, त्याचे ऐतिहासिक महत्त्व कायम स्मरणात राहील. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे शाखेच्या पदाधिकारी आणि संचालक मंडळाने या संमेलनाच्या यशस्वितेसाठी अतिशय परिश्रम घेतले आहेत.
विशेषत: या साऱ्याच परिश्रमांत धोत्रे काकांचे काम खूपच मोलाचे होते. ते कुठल्याही कंत्राटदाराला काम सोपवून शांत बसले नाहीत, तर त्यांनी स्वतः कार्यकर्त्यांबरोबर दिवसरात्र काम केले. तहानभूक विसरून, प्रत्येकाच्या खांद्याला खांदा लावून, त्यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या तळमळीमुळे संपूर्ण तालुका अभिमानाने उंचावला आहे.
धोत्रे काकांचे रंगभूमीबद्दल असलेले प्रेम आणि त्यांची तळमळ हे खरोखरच प्रेरणादायी आहे. तळेगावला शंभराव्या नाट्यसंमेलनाचा मान मिळावा, यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न थक्क करणारे होते. अखेरीस त्यांच्या या समर्पणामुळे तळेगावला शंभराव्या नाट्यसंमेलनाचा एक भाग होण्याचा सन्मान मिळाला, आणि त्यांचा हा अट्टहास यशस्वी ठरला.
संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर आता धोत्रे काकांना आणखी एक महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन केली असून, त्याचे अध्यक्ष म्हणून धोत्रे काकांची निवड करण्यात आली आहे. तळेगावातील नागरिकांना विश्वास आहे की धोत्रे काका त्यांच्या तळमळीने या जबाबदारीला न्याय देतील आणि वृद्ध साहित्यिक व कलावंतांचा योग्य सन्मान करतील यात शंका नाही…
लेखक: हर्षल आल्पे