धनंजय मुंडे सरकारमधील डाग, मनोज जरांगेंचा घणाघात
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची सीआयडी कोठडी
बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला अखेर 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर बीड कोर्टासमोर मोठा गदारोळ पाहायला मिळाला. वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांचे समर्थक आमनेसामने आले. यामुळे बीडमध्ये दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक इशारा दिला आहे.
“बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडे यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मुख्यमंत्री साहेब याला थांबावा, आम्हाला अशा टोळीमुळे त्रास झाला, तर आम्ही सहन करणार नाही”, असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
न्यायदेवता न्याय करणार आहे. संतोष देशमुखांच्या कुटुंबाची हाय लागली आहे. संतोष देखमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींवर मोक्का दाखल करा, असे मी आधीच म्हटले होते. ही आमची पहिल्यापासूनची मागणी होती. तसेच प्रचंड मोठा दहशत पसरवणारी, जातीयवाद, जातीय तेढ निर्माण करणारी धनंजय मुंडेंची टोळी आहे. या टोळीचा नायनाट झाला पाहिजे. या टोळीचा नायनाट करणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
आता याचा तपास पोलीस, सीआयडी, एसआयटी असा सर्वांचा एकत्रित होणार आहे. त्यांच्या हाती मोठे पुरावेही लागले आहेत. खून झाल्यावर एकमेकांना फोन केले आहेत. त्यांनी व्हिडीओ कॉलही केले. संतोष भय्या ओरडत होते, वेदना सहन करत होते. पण यांना काहीही दया-माया आली नाही. या आरोपींनी सरकारमधील मंत्र्याला वाचण्यासाठी फोन केले असणार आहेत. यांना साथ देणाऱ्यांनीही फोन केलेले आहेत. हे सर्व चार्जशीटमध्ये यायला हवं, असे मनोज जरांगे म्हणाले.





