देवळाली येथून दानापूर शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेनचा प्रारंभ
ट्रेनमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ, कामगारांना स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचे साधन उपलब्ध
जळगाव : देवळाली येथून दानापूर शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेनचा प्रारंभ झाला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जुळले होते. देवळाली स्थानकावर खासदार राजाभाऊ वाजे, भुसावळच्या डीआरएम इति पांडे, नागरिक, शेतकरी, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, की छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांसाठी पार्सल व्हॅनसोबतच ट्रेनमध्ये सामान्य वर्गाचे डबेही असून, त्यामुळे शेतकरी आणि प्रवाशांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या ट्रेनमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ मिळेल, पण कामगारांना स्वस्त आणि सोयीस्कर प्रवासाचे साधनही उपलब्ध होईल. यामुळे त्यांचे जीवनमान सुधारणार आहे. ही विशेष शेतकरी ट्रेन केवळ शेतकऱ्यांचा माल वेळेवर बाजारपेठेत पोहोचविण्यात मदत करेल असे नाही, तर कामगार आणि सामान्य लोकांसाठी प्रवासाचा नवा पर्यायही उपलब्ध करून देईल. दरम्यान, साप्ताहिक शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन शनिवार (ता. १९) पासून ९ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी दुपारी बाराला देवलाली येथून सुटेल आणि सोमवारी दुपारी तीनला दानापूर येथे पोचेल.
परतीच्या प्रवासात शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन सोमवार (ता. २१)पासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक सोमवारी सकाळी दहाला दानापूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री साडेदहाला मनमाड येथे पोहोचेल. ट्रेनमध्ये १० पार्सल वॅन, १० सामान्य द्वितीय श्रेणी आणि तीन लगेजसह ब्रेक वॅन असतील. ही गाडी नाशिक रोड, मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, बुऱ्हाणपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या रेल्वेस्थानकावर थांबेल.
लोडिंगसाठी प्रमुख थांबे
*नाशिक ते दानापरपासून अंतर : १,५०९ किलोमीटर
*मनमाड ते दानापूरपासून अंतर : १,४३६ किलोमीटर
*भुसावळ ते दानापूरपासून अंतर : १,२५२ किलोमीटर
*पार्सल केवळ दानापूरसाठी लोड केले जातील. यामुळे लॉजिस्टिक्स अधिक सुलभ होईल





