#Coronavirus: बीड शहरातही कोरोनाचा शिरकाव; एकूण संख्या पोहोचली १३वर
मुंबई, पुण्यातून परवानगी न घेता जिल्ह्यात घुसलेल्या लोकांनी स्थानिकांचा धोका वाढवला आहे. चार दिवसांपूर्वीच आलेले बारा जण करोनबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५० दिवस रोखलेला करोना विषाणू बाहेरून येत असलेल्या लोकांमुळे, ग्रामीण भागासह बीड, केज शहरातही बुधवारच्या अहवालाने शिरकाव झाला. नव्या ८ करोनाग्रस्तांमुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १३ झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातून ६६ जणांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. त्यातून बीड शहरातील सावतामाळी चौकातील ३, मोमीनपुरा भागातील २ तर चंदनसावरगाव व केळगाव (ता.केज) येथील प्रत्येकी १ आणि ईटकूर (ता.गेवराई) येथील बारा वर्षीय करोनाबाधित मुलीची आई असे आठ रुग्ण नव्याने आढळले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत २० कोरोनाबाधित आढळले होते. यांपैकी सांगवी पाटण (ता.आष्टी) येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर सहाजण उपचारासाठी पुण्याला गेले आहेत. आता बाधितांचा जिल्ह्यात एकूण आकडा १३ असून त्यांपैकी पिंपळा (ता.आष्टी) येथील एक करोनामुक्त झालेला आहे. हे सर्वजण मागील चार दिवसांपूर्वीच मुंबई, पुणे शहरातून जिल्ह्यात दाखल झाले होते. यातील काही कोणतीही परवानगी न घेता आले, अशा बाहेरच्या लोकांनी स्थानिकांचा धोका वाढविला आहे.
बुधवारी इतर जिल्ह्यांतून ११४ स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्याचा अहवाल येईल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.





