“तुम्ही मला दोन तारखेपर्यंत सांभाळा मी तुम्हाला पुढील पाच वर्ष..”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’ अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक तालुक्यांत भाजपने स्वबळावर लढवताच सांगोल्यातही तशीच परिस्थिती दिसली. त्यामुळे नाराज झालेल्या माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपवर विश्वासघाताचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला होता. आता, त्याच सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत मतदारांना आवाहन केलंय. सांगोल्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी तुम्ही मला दोन तारखेपर्यंत सांभाळा मी तुम्हाला पुढील पाच वर्ष सांभाळतो असे फडणवीस यांनी जाहीर सभेतून म्हटलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी यापूर्वीही सांगोल्यात प्रचाराला येत होतो. मात्र, जे माझे आदर्श होते त्या स्व. गणपतराव देशमुख यांच्या विरोधात मला मतं मागावी लागत होती. मात्र, यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आम्ही एकत्र लढत असल्याने हे मतं मागताना मला खूप आनंद होत आहे. सांगोल्यात आघाडी करताना शेकाप आणि भाजप एकत्र येत होते, त्यावेळी बापूंशीही बोलून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन मी केले होते.
हेही वाचा : ‘संसदेत ड्रामा नव्हे डिलीव्हरी व्हायला पाहिजे’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
आपल्याकडे नीती, नियत आणि मोदी साहेबांचा निधी असल्याने आपण राज्यातील सर्व नगरपालिकेत शहरांचे चेहरे-मोहरे बदलू. सांगोल्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुम्ही ही नगरपालिका निवडून आणा, देवाभाऊ सहित संपूर्ण सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे करतो, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.



