भरतशेठ थेट बोलून गेले, फुटीचे पोल खोलून गेले !

वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट एकमेकांविषयी सरळ बोलण्याचे नाव घेत नाहीत. एकमेकांचा उद्धार करणे, अगदी खालच्या दर्जाची भाषा वापरणे, संधी मिळेल, तेव्हा डिवचणे, सुरू असतेच.. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून स्वतः उद्धव आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत हे एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार किंवा मिंध्ये केल्याशिवाय शब्द उच्चारत नाहीत.. त्याचप्रमाणे, शिंदे गटाकडून म्हणजेच आत्ताच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट किंवा गुलाबराव पाटील हे तोंडसुख घेताना दिसतात. त्यात आता भर पडली आहे ती भरत गोगावले यांची!
शिवसेना पक्षाच्या फुटीची सल..
आपल्याला माहीत आहेच, की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात फूट पडली. या फुटीनंतर शिवसेना या पक्षाचे दोन तुकडे झाले. एक उद्धव ठाकरेंचा आणि दुसरा एकनाथ शिंदे यांचा! अर्थात नंतर शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना हे नाव मिळाले आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाणही त्यांनाच मिळाले. शिवसेना या पक्षाच्या फुटीची सल शिवसैनिकांच्या मनातून काही जाताना दिसत नाही.
गोगावले नेमके काय म्हणाले?
शिवसेना फुटीचा विषय निघाला, की दोन्ही गटातील शिवसैनिकांकडून काही घटना, आठवणींवर भाष्य करताना भावना आपसूक व्यक्त केल्या जातात. अशातच शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि आत्ताचे राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. शिवसेना पक्षाच्या फुटीमागे उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी वहिनींचा हात असल्याचा बॉम्बच गोगावलेंनी टाकला आहे.
बाहेर पडायला अनेक कारणे..
भरत गोगावले म्हणाले, की आम्ही शिवसेनमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप असायला पाहिजे, याचा विचार करायला पाहिजे. पडद्यामागून रश्मी वहिनींचा फारच मोठा हस्तक्षेप होता. ‘महाविकास आघाडी’ ची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी द्यायला हवी होती, असे गोगावले यांनी स्पष्टपणे सांगून टाकले आहे.
हेही वाचा – शिवसैनिकांचा रुद्रावतार.! उद्धवसेनेकडून स्मार्ट मीटरला विरोध
कुठे बाळासाहेब आणि कुठे उद्धवसाहेब?
बाळासाहेबांच्या कामाची पध्दत, आक्रमकपणा आणि बोलण्यावर ठाम राहण्याची हातोटी आम्हाला उध्दवसाहेबांमध्ये दिसलीच नाही. माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो, तेव्हा बाळासाहेब बोलले, खाली बसायचे नाही, तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढून घेणाराही मीच आहे. वंदनीय बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही. गोगावले यांचे स्पष्ट बोलणे वर वर साधेपणाचे दिसते, पण त्यांचा बोलविता धनी कोण? हे आता पाहायला हवे.
राजकारणातला वेगळाच प्रयोग..
महाराष्ट्रात सुमारे पाच वर्षांपूर्वी राजकारणात वेगळाच प्रयोग झाला होता. ‘महाविकास आघाडी’ च्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेना सत्तेत वाटेकरी झाली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तर आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात कॅबिनेटची माळ पडली होती. राज्यातील सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. त्यावेळी त्याची खूप चर्चा ही झाली होती. पण, सर्व सामान्य शिवसैनिकाला या दोन्हीही गोष्टी पटल्या नव्हत्या. तरी देखील अनेकांनी तोंडाला कुलूप लावले, हे गोगावले यांचे म्हणणे, पूर्ण महाराष्ट्राने अनुभवले आहे.
गोगावले यांचा थेट आरोप..
आता एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराने नेमका शिवसेना फुटीचा धागा पकडून आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद द्यायला नको होते असा सूर आळवला आहे. आदित्य ठाकरे यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले आहे. ‘मातोश्री’ हेच राजकीय केंद्र असल्याने त्यांचा राजकीय प्रवास तसा बालपणापासूनच झाला आहे. सिनेटपासून अनेक निवडणुकीचा त्यांनी अगोदर अनुभव घेतला. आदित्य यांना पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून त्यांना आमदारकी लढवण्याची संधी मिळाली . तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. त्यानंतर ‘महाविकास आघाडी’ त त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली होती, हे सर्वांना आठवत असेलच.
आदित्य यांच्या मंत्रिपदामुळे नाराजी..
आदित्य ठाकरे यांना त्यावेळी शिवसेनेने कॅबिनेट मंत्रीपद दिले होते. त्यावर भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद द्यायला नको होते. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी दिली पाहिजे होती, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी ‘महाविकास आघाडी’ ची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिले पाहिजे होते, हे गोगावले यांचे म्हणणे प्रत्येक शिवसैनिकाच्या तोंडी त्यावेळी होते.. कदाचित, तसे झाले असते तर शिवसेनेत फूट पडलीच नसती.
पत्नीचे ऐकणारे उद्धव ठाकरे..
भरत गोगावले यांचा मुख्य आक्षेप हा रश्मीवहिनींवर आहे. उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचे खूप म्हणजे जवळजवळ प्रत्येक गोष्ट ऐकतात. पण, प्रत्यक्षात त्यांनी रश्मी वहिनींचे नाव स्पष्टपणे घेतले नाही.उद्धव ठाकरे बाईचे ऐकत होते. त्यांचा प्रत्यक्ष रोख हा रश्मी ठाकरे यांच्यावरच होता. नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे.
महिलांचा हस्तक्षेप कुठपर्यंत?
महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे, याचाही विचार करायला पाहिजे. पडद्यामागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असायच्या. मात्र, नंतर बदल व्हायचा, असा आरोप गोगावले यांनी केला आहे.
ताकदवान नेत्याला डावलले..
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. जेव्हा संधी मिळाली त्यावेळी क्रमांक दोन च्या नेत्याला त्यांनी पुढे केले. त्यामुळेच मनोहर जोशी आणि नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले. स्वतः बाळासाहेब कधीही मोठी पदे मिळवू शकले असते. त्यामुळेच त्यांची ही गोष्ट प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात ठसली होती. नेमके उद्धव ठाकरे येथेच चुकले. त्यांच्यानंतर पक्षातील सर्वात ताकदवान नेता म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले असते तर कदाचित शिवसेनेतील ही फूट पडलीच नसती, आणि महाराष्ट्रातील एक बलवान पक्ष म्हणून शिवसेना पुढे आली असती. पण, ही झाली जर तर ची भाषा ! भरत गोगावले बरेच काही बोलून गेले असले तरी अन्य शिवसैनिकांच्या मनात अजून खदखद कायम आहे, ती आज ना उद्या बाहेर पडणारच आहे, आपण वाट पाहू या !