Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीमध्ये नारीशक्तीचा सहभाग महत्त्वाचा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस     

मुंबई : विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्तीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशाच्या विकास वाटचालीत नारीशक्तीचे योगदान महत्त्वाचे असून ही नारीशक्ती ज्यावेळी संसाधन म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल, तेव्हाच भारत पूर्णपणे विकसित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा शब्दात नारी शक्तीचा सन्मान करीत देशात सर्वात पहिल्या एक कोटी लखपती दीदी महाराष्ट्रातच झाल्या पाहिजे, असे आवाहन यावेळी केले.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत मंत्री जयकुमार गोरे, कौशल्य विकास , उद्योजकता व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्राम विकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले,  राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, मुख्य परिचलन अधिकारी श्री. ओसवाल उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नारीशक्तीच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत.  त्याचा लाभ महिलांना होत आहे.  राज्यात ५० लक्ष लखपती दीदी तयार होत आहे. महिलांशी संबंधित असलेल्या सर्व यंत्रणा  ‘पावर हाऊस’  आहे. या महिला शक्तीच्या योगदानातून शासनाने सुरू केलेली  ३०० कोटी वृक्ष लागवड  मोहीम यशस्वी करायची आहे.  उमेदच्या माध्यमातून यासाठी एक योजना तयार करण्यात यावी. या योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना नर्सरी तयार करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नर्सरी तयार करण्यापासून झाडे लावणे आणि त्याची निगा राखणे यासाठी पण खर्च शासन स्तरावरून देण्यात येईल. अशा महिला बचत गटांना वृक्ष लागवडीतून  व्यावसायिक स्वरूपात मिळकत देखील होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाशी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची तुलना होऊ शकते, अशा प्रकारचे स्वरूप या प्रदर्शनाच्या आयोजनाला देण्यात आले असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात संबंधित विभाग आणि यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचतगटांची मोठी चळवळ सुरू आहे. या चळवळीशी कोट्यावधी महिला जोडल्या गेल्या आहेत. बचतगटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी आपली उत्पादने तयार केली असून त्यासाठी बाजारपेठही मिळवली आहे. कुटुंबासोबतच बचतगट सक्षम करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले काम या महिलांनी केले आहे.

हेही वाचा –  मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात नमो उद्यानाचे भूमिपूजन

महालक्ष्मी सरस प्रदर्शन महिला बचत गटांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ आहे. सर्वसाधारण महिलांपासून ते अन्न तंत्रज्ञानात शिक्षण घेतलेल्या महिलांपर्यंत महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित उत्पादने महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये उपलब्ध असतात. व्यावसायिक स्वरूपामध्ये पॅकेजिंग केलेल्या वस्तू या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतात. यावरून कुठल्याही स्पर्धेसाठी महिला बचतगट आता सज्ज असल्याचे दिसत आहे.

देशात ई-कॉमर्स मोठ्या वेगाने वाढत आहे. उमेद मार्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून महिला बचतगटांच्या उत्पादनांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर १००० पेक्षा जास्त वस्तू आहेत. राज्यातील नागरिकांनी उमेद मार्ट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करावी, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महिला बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी २० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलचे काम सुरू करण्यात आले आहे. उर्वरित १६ जिल्ह्यांमध्ये मॉलचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. काही वर्षात उमेद मॉलचे जाळे तालुका स्तरापर्यंत  विस्तारित करायचे आहे, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

प्रास्ताविकात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले,  महिलांच्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ महालक्ष्मी सरसमधून मिळाली आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचे देशातील हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. महिलांना सर्व क्षेत्रात सक्षम करण्याचे काम होत आहे. गाव खेड्यातील महिला सक्षमपणे पायावर उभ्या राहत आहे. राज्यात महिला बचत गटांच्या माध्यमातून ‘उमेद’ ३९ हजार ५५८ गाव खेड्यात पोहोचले आहे.  महिला बचत गटांच्या चळवळीमुळे ६४ लाख कुटुंबाना लाभ मिळाला आहे. राज्यात सध्या ६ लक्ष ६८ हजार बचत गट आहेत. महिला बचत गटांसोबतच राज्यात ३३१ महिला शेतकरी कंपन्या आहेत.

विविध योजनांच्या आणि यंत्रणांच्या माध्यमातून महिलांना कर्ज वितरित करण्यात आले आहे. मात्र कर्ज परत फेडण्याची महिलांची वृत्ती त्यांचे वेगळेपण निदर्शनास आणते. त्यामुळे महिलांसाठी दिलेल्या कर्जाचा एनपीए १ टक्क्यांच्यावर नाही, असेही ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले. प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button