खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक उड्डाणे रद्द
अनेक विमानांची उड्डाणं वळवली, 50 हून अधिक फ्लाईट रद्द, प्रवाशांचे हाल

दिल्ली : राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरामध्ये शुक्रवारी जोरदार धुळीचं वादळ निर्माण झालं होतं. याचा फटका दिल्लीकरांना शनिवारी देखील बसल्याचं पाहायला मिळत आहे. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अनेक उड्डाणे वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही उड्डाणं रद्द देखील करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे अनेक विमानं आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिरानं विमानतळावर पोहोचली. या संदर्भात एअर इंडियाकडून शनिवारी आपल्या प्रवाशांसाठी एक ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. शनिवारी पुन्हा एकदा सायंकाळी 5:30 ते रात्री 9 च्या दरम्यान शहरात धुळीचं वादळ निर्माण होऊ शकते. त्याचा परिणाम हा विमान वाहतुकीवर पडू शकतो, असं एअर इंडियाकडून आपल्या प्रवाशांना सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा – शिवरायांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका; अमित शहा यांचे जनतेला आवाहन
एअर इंडियाने यासंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, शुक्रवारी जसं धुळीचं वादळ निर्माण झालं होतं, तसंच वादळ आज देखील सायंकाळी 5:30 ते रात्री 9 च्या दरम्यान पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर काही उड्डाणं वळवण्यात येतील याचा परिणाम हा एअर ट्रॅफिकवर पडू शकतो. त्याचा परिणाम म्हणून काही विमानांना विलंब देखील होऊ शकतो. आमची टीम याबाबत आढावा घेत आहे. परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल. प्रवाशांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
एअर इंडियानं आपल्या प्रवाशांना अशी देखील विनंती केली आहे की, काही विमानांना त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा जास्त विलंब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आपल्या फ्लाईटच्या वेळेसंदर्भात अपडेट राहा. एअर इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन ठरावीक अंतरानं आपल्या विमानाच्या वेळेच्या स्थितीबाबत माहिती घ्या. खराब वातावरणामुळे प्रवाशांना जो त्रास होत आहे, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, असंही एअर इंडियानं म्हटलं आहे.
शुक्रवारी दिल्लीमध्ये जोरदार धुळीचं वादळ आलं, याचा मोठा परिणाम हा दिल्लीतील विमान सेवेवर झाला आहे, 50 पेक्षा जास्त देशांतर्गत विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. आज देखील या धुळीच्या वादळाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे.