कुंभमेळ्यात तब्बल १०२ भाविक कोरोना पॉझिटिव्ह

हरिद्वार – देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत असून प्रचंड गर्दीत कोरोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. अशातच महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पॉझिटिव्ह भाविकांमुळे राज्य सरकारबरोबर केंद्राचीही चिंता वाढली आहे.
कुंभमेळ्यातील सोमवारी शाहीस्नान पार पडले. गंगेतील दुसऱ्या पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये तब्बल २८ कोटी साधू आणि भाविक दाखल झाले होते. उत्तराखंडच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ११.३० ते सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १८ हजार १६९ भाविकांची चाचण्या करण्यात आल्या. यात १०२ साधू आणि भाविक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, पहिल्या शाहीस्नानाला ३२ लाख भाविक हरिद्वारमध्ये दाखल झाले होते. तर तिसरं शाहीस्नान बुधवारी होणार आहे.





