हगवणे कुटूंबाला मोक्का लावा; अंबादास दानवे यांची मागणी

पिंपरी | वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्या प्रकरण हे लाजीरवाणे, हदय पिळवटून टाकणारे कृत्य आहे. हगवणे कुटूंबिय आणि नीलेश चव्हाण या सगळ्यांनी मिळून हा खूनच केला आहे. पोलीस काय म्हणत असतील तर सर्व खोटे आहे. आरोपींनी वेळोवेळी कस्पटे यांना धमक्या दिल्या आहेत. त्यावरून हा संघटीतप ण केलेला खून आहे, अशा लोकांना मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.
वाकड येथे वैष्णवी हगवणे हिच्या कुटूंबियांची अंबादास दानवे यांनी सोमवारी (दि. २६) भेट घेतली आणि सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख, माजी आमदार, अॅड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख संजोग वाघेरे-पाटील, जिल्हा संघटीका अनिता तुतारे, माजी शहरप्रमुख सचिन भोसले, जिल्हा उपप्रमुख रोमी संधू, युवराज कोकाटे, हरिष नखाते, दस्तगिर मनियार, मोहन बारटक्के आदी उपस्थित होते.
अंबादास दानवे म्हणाले, सून ही मुलीसारखीच असते. मात्र, सासरच्यांनी तिला हालहाल करून मारले. नांदवायचे नव्हते तर तिला माहेरी पाठवायचे होते. मात्र, अशा एका सालस, गुणवान मुलीचा जीव घेतला. जीव घेत असताना ज्या पद्धतीने वर्षा दोन वर्षामध्ये वैष्णवीचा छळ केला, हे लाजीरवाणे, हदय पिळवटून टाकणारे कृत्य सासरच्यांनी केले आहे. तिच्या अंगावरील व्रण पाहिल्यास ३४ ठिकाणी व्रण आहेत. त्यामुळे हा खूनच आहे. पोलीस काय म्हणत असतील तर सर्व खोटे आहे. हे प्रकरण पोलीसांनी गांभीर्याने घेतले नाही.आरोपी हे अजित दादांच्या पक्षांशी संबंधित आहेत. त्यामुळे राजकीय दबावाखाली पोलीस कारवाई करायला धजावले नसतील.
हेही वाचा : देशभरात पुन्हा करोनाचे सावट; महाराष्ट्रात २०९, तर दिल्लीत १०४ रुग्ण
हगवणे कुटूंबिय आणि नीलेश चव्हाण या सगळ्यांनी मिळन खूनच केला आहे. त्यांनी वेळोवेळी कस्पटे यांना धमक्या दिल्या आहेत. नीलेश चव्हाण याने बाळ घ्यायला गेलेल्या कस्पटे कुटूंबाला पिस्तुल दाखवले. हे सर्व पाहिल्यास या लोकांना वैष्णवीचा खूनच करायचा होता. हे स्पष्ट होते. त्यावरून हा संघटीतपणे केलेला खून आहे. अशा लोकांना ‘मोक्का’च लावला पाहिजे. या खटल्यासाठी कुटूंब ज्या वकीलाची मागणी करेल, तोच वकील नियुक्त केला पाहिजे. खटला फार्स्ट टँकमध्ये चालवला पाहिजे. आठ दिवस आरोपी पुण्याच्या परिसरातच फिरत होते. मोबाईल चालू होते. त्यांनी विविध गाड्या वापरल्या. प्रसारमाध्यमे, लोकांचा दबाव वाढल्यानंतर अटक झाली. प्रत्येक गोष्टीत दबावच वाढला पाहिजे, असा पोलीसांचा रोल दिसतो. पोलीसांनी या तपासात काही बारकावे सोडले तर आम्ही या कुटूंबाची बाजू घेऊ, हगवणे कुटूंबाला फासावर लटकावण्यासाठी प्रयत्न करू, असेही दानवे म्हणाले.
राज्य महिला आयोगाला विचारतय कोण
मी राजकीय विषयात काही जात नाही. महिला आयोग फक्त अन्यायग्रस्तांची सुनावणी घेते. त्या आयोगाला कोणता अधिकार नाही. नोटीस देण्यापुरता आणि घेण्यापुरता राज्य महिला आयोग आहे. राज्य महिला आयोगाने एखाद्या अन्यायग्रस्त महिलेला न्याय दिला आहे, हे दाखवून द्या. महिला आयोगाला फुकट कोणी विचारत नाही. एखादी घटना घडल्यावर भेट देणे एवढेच महिला आयोगाचे काम आहे. आयोग काय करते, यापेक्षा पोलीसांनीच योग्य भुमिका पार पाडावी, असेही अंबादास दानवे म्हणाले.