अल्फ्रेड चक्रीवादळामुळे ऑस्ट्रेलियात हाहाकार
चक्रीवादळ आता उत्तरेकडून पश्मिमेकडे सरकलं असून, सध्या या वादळाचा वेग प्रतितास 55 किमी इतका

ऑस्ट्रेलिया : सायक्लॉन अल्फ्रेड ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीला धडकलं आहे. या चक्रीवादळामुळे ऑस्ट्रेलियात हाहाकार उडाला आहे. लाखो लोकांना या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून, अनेक जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर तुफान पाऊस सुरू आहे. स्थानिक अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार या घटनेत अनेकजण जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेकडून पश्मिमेकडे सरकलं असून, सध्या या वादळाचा वेग प्रतितास 55 किमी इतका आहे. या चक्रीवादळामुळे सध्या देशात मुसळधार पाऊस सुरू आहे.
चक्रीवादळात एकाचा मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चक्रीवादळामुळे सध्या ऑस्ट्रेलियात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नदी नाल्याला पूर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेल्स डोरिगो शहराजवळून वाहणाऱ्या एका नदीमध्ये एक 61 वर्षीय व्यक्ती वाहून गेला होता. त्याची शोध मोहिम सुरू होती. मात्र त्याला वाचवण्यात अपयश आलं असून, त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
हेही वाचा – शहरातील फेरीवाल्यांना फेरीवाला प्रमाणपत्र वाटप सुरू
13 जवान जखमी
दरम्यान या घटनेमध्ये तेरा जवान देखील जखमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या चक्रीवादळामुळे ऑस्ट्रेलियात अपत्कालीन परिस्थिती आहे. बचाव कार्यासाठी निघालेल्या सैनिकांचा एक ट्रक पलटी झाला, या ट्रकमध्ये असलेले तेरा जवान जखमी झाले आहेत. या सैनिकांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यातील काही जवानांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान अतिमुसळधार पाऊस आणि वादळामुळे ऑस्ट्रेलियाच्या अनेक शहरातील बत्ती गूल झाली असून, लाखो लोक अंधारात आहेत. मात्र आता हळूहळू परिस्थिती नियंत्रण येत असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतातही पावसाचा इशारा
दरम्यान दुसरीकडे भारतात देखील पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आयएमडीकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पुढील पाच दिवस हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील पाच जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.