सावरकरांची ‘बॅरिस्टर’डिग्री परत आणणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनला जाऊन ग्रेज इनमधून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. पण ब्रिटिश सरकारने त्यावेळी त्यांना पदवी व सनद दिली नव्हती. आता महाराष्ट्र सरकार मुंबई विद्यापीठाच्या मदतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘बॅरिस्टर’ ही पदवी आणि सनद सन्मानपूर्वक भारतात यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे’, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मुंबई विद्यापीठात स्वा. सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेली सनद त्यांना देण्यात आली नव्हती. हा त्यांच्या बुद्धिमत्तेवरचा अन्याय होता. तसेच, ब्रिटिश साम्राज्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ न घेता त्यांनी जाज्ज्वल्य देशभक्तीचे उदाहरण दिले. मात्र, आता राज्य सरकार ही सनद आणि पदवी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुंबई विद्यापीठाने त्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करावीत’, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हेही वाचा – पुण्यातील अतिक्रमण आणि अवैध उत्खनन प्रकरणी बावनकुळे आक्रमक, 3 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये जाऊन ‘ग्रेज इन’ येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. मात्र, बॅरिस्टर किंवा ‘बार ॲट लॉ’ ही सनद मिळवण्यासाठी त्यावेळी ब्रिटिश साम्राज्याशी आणि ब्रिटिश राजाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागत होती. ही शपथ घेण्यास नकार दिल्याने स्वा. सावरकर यांना ही सनद व पदवी प्रदान करण्यात आली नव्हती, असा उल्लेख अनेक चरित्रांमध्ये येतो. ‘माझी जन्मठेप’ या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रपर ग्रंथातही त्यांनी असाच उल्लेख केला होता.
मुंबई विद्यापीठ स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचे उद्घाटन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे थोर विद्वान, कवी, इतिहासकार, पुरोगामी विचारवंत आणि अग्रणी समाजसुधारक होते. त्यांनी अस्पृश्यतेच्या प्रथेला पाप आणि माणुसकीवरील कलंक मानले. दलितांना मंदिरात प्रवेशासाठी त्यांनी लढा दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही जातीभेद निर्मूलनासाठी सावरकरांच्या कार्याचे आणि वचनबद्धतेचे कौतुक केले होते’, अशी भावना राज्यपालांनी व्यक्त केली.