गॅस-पेट्रोलनंतर आता औषधेही महागणार; सरकारने दरवाढीस दिली मंजुरी

Medicine Price Hike | गॅस, सोने-चांदी आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एक मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. देशात औषधांच्या किमती वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून सरकारने मर्यादित दरवाढीस अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच बाजारातील अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (NPPA) 2025 च्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित 0.65 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर औषध उत्पादक कंपन्यांना ठराविक सूत्रानुसार कमाल किरकोळ किंमत (MRP) वाढवण्याची मुभा मिळणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी कंपन्यांना पुन्हा स्वतंत्र सरकारी मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार नाही.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये ५ सार्वजनिक ग्रंथालयांना मुदतवाढ प्रस्ताव
दरम्यान, औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. प्लास्टिक, ॲल्युमिनियम आणि विविध रासायनिक घटक महागल्याने गोळ्या, सिरप आणि त्यांच्या पॅकेजिंगचा खर्चही वाढला आहे. याशिवाय सिरिंज आणि थर्मामीटरसारख्या वैद्यकीय उपकरणांच्या किमतीत वाढ झाल्याने आरोग्य सेवा अधिक खर्चिक होण्याची शक्यता आहे.
नवीन आकडेवारीनुसार, काही महत्त्वाच्या औषधांच्या कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पॅरासिटामॉलच्या कच्च्या मालाच्या किमतीत सुमारे 47 टक्के, अमोक्सिसिलिन ट्रायहायड्रेटमध्ये 45 टक्के, डायक्लोफेनॅकमध्ये 54 टक्के, डायक्लोफेनॅक पोटॅशियममध्ये 33 टक्के आणि सिप्रोफ्लोक्सासिनमध्ये तब्बल 60 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.





