सरकारी आदेशाचे पालन करा, नाहीतर कारवाई करू! ट्विटरला केंद्राचा इशारा
![Obey the government order, otherwise we will take action! Center alert to Twitter](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/SAVE_202.jpg)
नवी दिल्ली – ‘सरकारी आदेशाचे पालन करा, नाहीतर ट्विटरवर कारवाई करू’, असा सज्जड इशारा देणारी नोटीस केंद्र सरकारने ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मला बजावली आहे. ‘फार्मर जिनोसाइड’ या हॅशटॅगशी संबंधित मजकूर आणि खाती हटविण्याच्या आदेशाचे पालन करावे, असा इशारा केंद्र सरकारने ट्विटरला दिला आहे.
केंद्र सरकार शेतकऱ्यांचा संहार घडवू पाहत असल्याचा आरोप करणाऱ्या चिथावणीखोर सुमारे २५० खात्यांवर प्रतिबंध घालावा, असे निर्देश माहिती-तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने ३१ जानेवारीला ट्विटरला दिले होते. मात्र ट्विटरने ही खाती पूर्ववत केली. त्यामुळे केंद्राने नाराजी व्यक्त करत ठाम भूमिका घेऊन ट्विटरला एक खरमरीत नोटीस बजावली आहे. ‘सरकारी आदेशाचे पालन करत जो मजकूर ट्विटरवरुन काढून टाकण्यास सांगितले आहे तो मजकूर ताबडतोब हटवावा. परस्पर लवादाच्या भूमिकेत शिरुन निवाडा करण्याचा प्रयत्न करू नये. ट्विटर हे एक माध्यम आहे. सरकारी आदेशाचे पालन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर केली तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल’, असे सरकारने बजावले आहे. तसेच या नोटिशीत सरकारचे आदेश आणि अधिकार याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या अर्धा डझनहून अधिक निकालांचा दाखला देण्यात आला आहे.
दरम्यान, ठराविक दिवसांत विशिष्ट ट्वीटविषयी आक्षेप घेणाऱ्यांनी त्यांची भूमिका आमच्याकडे सादर करावी. आक्षेप योग्य वाटल्यास संबंधित ट्वीट कायमचे हटवले जाईल, असे ट्विटरचे म्हणणे आहे. मात्र ट्विटरच्या या भूमिकेवर आक्षेप घेत केंद्र सरकारने नोटीस पाठविली आहे. लवादाच्या भूमिकेत शिरुन निवाडा करण्याचा प्रयत्न करू नका. सरकारी आदेशाचे पालन करा, असे केंद्र सरकारने ट्विटरला बजावले आहे.