देशातील कोरोनाबाधितांची संख्या 90,50,598 वर
नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत मागील अनेक दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ९० लाखांच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या 24 तासांत देशात 46,232 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 564 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 90,50,598 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,32,726 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 49,715 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 84,78,124 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 4,39,747 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता दिवसेंदिवस दिवसभरातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी एकूण रुग्णसंख्या ९० लाखांच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे.





