जम्मू-काश्मीरमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड 2जी मोबाइल इंटरनेट सेवा सुरू

श्रीनगर | पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद राहिल्यानंतर अखेर शनिवारी काश्मीर खोऱ्यात पोस्टपेडसोबतच प्रीपेड इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. एका तपासात असं समोर आलं आहे की, जम्मू-काश्मीर सरकारने मंजूरी दिलेल्या 301 वेबसाइट काश्मीर खोऱ्यातील लोकांना सर्च करणं शक्य होणार आहे.
जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या गृह विभागाने एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, मोबाईल फोनवर 2जी स्पीडसोबत इंटरनेट सुविधा 25 जानेवारीपासून सुरू होणार असं सांगण्यात आलं होतं. सोशल मीडिया साईट्सचा वापर खोऱ्यातील लोकांना अद्याप करता येणार नसून फक्त काही वेबसाइट्सचा वापर करणं त्यांना शक्य होणार आहे, असं अधिसूचनेत सांगण्यात आलं होतं. तसेच ही सेवा पोस्टपेड आणि प्रीपेड सिम कार्डवर उपलब्ध असल्याचंही सांगितलं गेलं होतं.
ज्या साइट्स वापरण्यास मंजूरी देण्यात आली आहे, त्यामध्ये सर्च इंजिन आणि बॅकिंग, शिक्षणविषयक साइट्स, बातम्या, ट्रॅव्हल आणि रोजगाराशी निगडीत साइट्सचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर 5 ऑगस्ट रोजी खोऱ्यातील इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आल्या होत्या.





