एअर इंडियानं स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरच्या दिवशीच 48 वैमानिकांना सेवेतून केलं बरखास्त
एअर इंडियानं स्वातंत्र्य दिनाच्या अगोदरच्या दिवशीच आपल्या ४८ वैमानिकांना सेवेतून बरखास्त केलंय. या वैमानिकांनी गेल्या वर्षी आपला राजीनामा कंपनीकडे सोपवला होता. परंतु, नियमानुसार सहा महिन्यांच्या नोटिशीच्या आत त्यांनी आपले राजीनामे परत घेतले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियानं या वैमानिकांना राजीनामा परत घेण्यास स्वीकृती दर्शवली होती. मात्र गुरुवारी अचानक ही स्वीकृती रद्द करण्यात आली. सोबतच, या ४८ वैमानिकांची सेवा १३ ऑगस्ट २०२० पासून तत्काळ प्रभावानं समाप्त करण्यात आलीय.
शुक्रवारी सकाळी कामावर दाखल झालेल्या या वैमानिकांना मात्र याबद्दल काहीही कल्पना नव्हती. आता आपण एअर इंडियाचे कर्मचारी राहिलेलो नाही हे माहीत नसल्यानं ते कामावर हजर झाले होते. परंतु, अचानक सेवेतून काढून टाकल्याचं समजल्यानं त्यांना मोठा धक्का बसला. यासंदर्भात वैमानिक युनियननं सीएमडी आणि नागरी उड्डाण मंत्र्यांकडे तक्रार करणारं एक पत्रंही धाडलंय.
‘एअर इंडिया’ला करोना संकट काळात आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागतंय. आपल्या काही कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय पाच वर्षांच्या सुट्टीवर धाडण्याची घोषणा याआधीच एअर इंडियाकडून करण्यात आलीय. त्यावर, ‘करोना संकट काळात एअरलाईन्सला मोठं नुकसान सहन करावं लागतंय. खर्च कमी करण्यासाठी अनेक मार्ग स्वीकारण्यात आले आहेत. त्यातील एक मार्ग म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणं’ असं एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल यांनी म्हटलं होतं.
एअर इंडियानं बेकायदेशीरपणे वैमानिकांना सेवेतून बडतर्फ केल्याचं ‘इंडियन कमर्शिअल पायलटस् असोसिएशन’नं म्हटलंय. प्रशासनानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी आयसीपीएकडून करण्यात आलीय. करोना संकट काळात देशाची सेवा करणाऱ्यांना अशा पद्धतीनं बडतर्फ करणं, ही एक धक्कादायक गोष्ट असल्याचंही आयसीपीएनं म्हटलंय. याविषयी आयसीपीएकडून शुक्रवारी एअर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव बन्सल यांना एक पत्रही धाडलंय. दक्षिणेत पाच वर्ष पूर्ण करणाऱ्या अनेक बेस क्रू मेम्बर्सच्या करांरांचं नविनीकरण थांबवण्यात आलंय. काहींची सेवाही समाप्त करण्यात आलीय, असंही आयसीपीएनं आपल्या पत्रात नमूद केलंय.





